सासवड-जेजुरी पालखी महामार्ग अंधारात
खळद, ता. १० : सासवड–जेजुरी पालखी महामार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्षात अद्याप या मार्गावरील वीजपुरवठा सुरू झालेला नाही. परिणामी रात्रीच्या वेळी या महामार्गावर पूर्ण अंधार पसरत असून, वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे या महामार्गावरील काही ठरावीक ठिकाणी, विशेषतः ज्या ठिकाणी पुलांची कामे करण्यात आली आहेत, तेथेच विद्युतीकरण करण्यात आले आहे. मात्र संपूर्ण सासवड-जेजुरी महामार्गाचा विचार करता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे. अनेक ठिकाणी घरे, दुकाने, हॉटेल्स तसेच शेतवस्त्या महामार्गालगत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना रस्ता अतिशय जवळ आला आहे, काही ठिकाणी घरातून बाहेर पडले तर लगेच रस्त्यावरती यावे लागत आहे. यातून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंधारामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले असून महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना विशेष अडचणी येत आहेत.
हा मार्ग पालखी महामार्ग असल्याने आषाढी व कार्तिकी यात्रेच्या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, तर बाराही महिने पायी वारी करणारे वारकरी सातत्याने या मार्गावरून ये-जा करत आहेत. मात्र अपुऱ्या विद्युतीकरणामुळे अपघातांचा धोका वाढत असून, सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. “फक्त पुलांपुरते नव्हे, तर संपूर्ण महामार्गालगत रस्त्याच्या दुतर्फा विद्युतीकरण होणे अत्यावश्यक आहे,” अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या विषयाकडे विशेष लक्ष देऊन, विद्युतीकरणाचे काम कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्षात वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, तसेच संपूर्ण सासवड-जेजुरी महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिवे बसवावेत. लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असे परिसरातील नागरिकांकडून वारंवार सांगितले जात आहे.
वीज अद्याप सुरू झाली नाही, याची माहिती नसल्याचे सांगत काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे, उर्वरितही काम सुरू असून, जानेवारी महिन्यापर्यंत वीज सुरू होईल.
- अभिजित औटी, सहाय्यक प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
जेजुरीपर्यंत चाचणी (टेस्टिंग) पूर्ण झाली असून, या महिन्याअखेर सर्व टेस्टिंग पूर्ण करून वीजपुरवठा सुरू केला जाईल. पुलाखालील अंधार व अर्धवट कामाबाबतही वीजपुरवठा सुरळीत करताना तेथे विद्युतीकरण केले जाईल व कुठेही पुलाखाली अंधार राहणार नाही.
- अजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक, ठेकेदार कंपनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

