
वाशेरेतील नळपाणी योजना म्हणजे पांढरा हत्ती
कडूस, ता. ११: जलजीवन मिशन अंतर्गत वाशेरे (ता.खेड) गावासाठी चासकमान धरणातून पाणी उचलणारी अडीच कोटी रुपयांची नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी जाहीर निविदेची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, योजनेच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना वस्तुस्थितीचा विचार केला नाही. ही योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे, असा आरोप माजी सरपंच उल्हास कुडेकर यांनी केला आहे.
भविष्यात ही नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी योजनेवरील देखभाल दुरुस्ती, लाइटबिल व कर्मचाऱ्यांसाठी करावा लागणार खर्च आणि ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न याचा विचार केला तर ही पाणीपुरवठा योजना म्हणजे ''चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला'' होणार असल्याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे.
केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत साडेतीन हजार लोकवस्ती असलेल्या खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील वाशेरे गावासाठी २ कोटी ५३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक असलेली नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी भविष्यात लाइटबिल, योजनेची देखभाल दुरुस्ती खर्च व ग्रामपंचायतीचे उत्पन्न याचा विचार केला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही योजना म्हणजे ग्रामपंचायतीने पांढरा हत्ती पोसण्यासारखी परिस्थिती होणार आहे. चासकमान धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. हे अंतर सुमारे सात किलोमीटर आहे. त्यात सुमारे पंधराशे फूट उंचीवर पाइपलाइनद्वारे पाणी वाहून आणावे लागणार आहे. यासाठी ठिकठिकाणी सहा विद्युत पंप आराखड्यात आहेत. एवढ्या विद्युत मोटारी एकाच वेळी सुरू केल्याशिवाय गावात पाणी पोचणार नाही. भविष्यात या विद्युत पंपांचे वीज बिल लाखात येईल. दुरुस्ती व कर्मचारी वर्गाचा खर्च वेगळा असणार आहे. असे कुडेकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न बघता भविष्यात हा सर्व खर्च ग्रामपंचायत व ग्रामस्थ करू शकतील याची शाश्वती नाही. परिणामी योजना बंद पडेल. शासनाच्या धोरणानुसार पुढील तीस वर्षात पाण्यासाठी निधी मिळणार नाही. यामुळे या योजनेचा फेरविचार करण्याची मागणी ग्रामीण
पाणी पुरवठा विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.
- उल्हास कुडेकर, माजी सरपंच
धरणातून पाणी उचलले तरच कायमस्वरूपी पाण्याची सोय होईल. पाण्याची समस्या मिटली तर ग्रामस्थांचा आर्थिक विकास होईल. आर्थिक स्रोत बळकट झाले तर गावची साडेतीन हजार लोकसंख्या लाइटबिल आदी खर्चाचा भार उचलतील. विरोधक जाणूनबुजून चांगल्या कामात विघ्न आणीत आहेत. त्यांना पाण्याची समस्या कायमची दूर झालेली बघवत नाही.
- संभाजी कुडेकर, सरपंच