साबुर्डीतील विकासकामांच्या चौकशीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साबुर्डीतील विकासकामांच्या चौकशीची मागणी
साबुर्डीतील विकासकामांच्या चौकशीची मागणी

साबुर्डीतील विकासकामांच्या चौकशीची मागणी

sakal_logo
By

कडूस, ता. ६ ः साबुर्डी (ता. खेड) येथे गेल्या दोन ते मागील दहा वर्षाच्या कालावधीत झालेल्या विविध विकास कामांमध्ये अनियमितपणा, भ्रष्टाचार झाला असून या कामांची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव तापकीर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. जबाबदार कर्मचाऱ्यांच्या चल-अचल मालमत्तेची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत तापकीर यांनी मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यामध्ये गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामनिधी, वित्त आयोग निधीतून व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या विविध निधीतून गावात झालेल्या विविध विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लेखी तक्रारीत म्हटले आहे. शाळा वर्ग खोल्यांचे बांधकाम, जुनावणे वस्तीकडे जाणारा रस्ता, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम, बंदिस्त गटार, समाजमंदिर दुरुस्ती, चौदाव्या वित्त आयोगांतर्गत स्मशानभूमी शेड उभारणे, जाखलेवाडी-ठाकरवस्ती रस्त्याचे काँक्रिटीकरण, जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाकीचे बांधकाम, पाइपलाइन खोदकामाचा सहभाग आहे. यातील काही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची तर काही कामे झालीच नसल्याची तक्रार आहे. जाखलेवाडी ठाकरवस्तीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी नैसर्गिक स्रोताच्या ठिकाणी साठवण टाकी बांधण्याकरिता सात लाख रुपये खर्च केले. परंतु, काही दिवसातच हे काम पूर्णपणे पडून गेले असे असतानाही ठेकेदारावर मेहेरनजर दाखविली आहे. या कामांची चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत ग्रामसेवक व्ही. डी. महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘हे सर्व विषय मागील दोन वर्षांपासून दहा वर्षांपर्यंत जुने आहेत. माझ्याकडे तात्पुरता चार्ज आला आहे. माझ्या कार्यकाळातील विषय नाही. तरीही मी माहिती घेतो.’’