

कडूस, ता. १० : दोंदे (ता.खेड) येथे बिबट्याने गोठ्यात शिरून दिवसाढवळ्या तीन शेळ्या ठार केल्याच्या घटनेची वनविभागाने गंभीर दखल घेतली आहे. मानव बिबट संघर्षाची शक्यता निर्माण झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाच्या वतीने बिबट जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. गावात व वाड्यावस्त्यावर जाऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील रानमळा, गारगोटवाडी, कहू कोयाळी, साकुर्डी, वेताळे, कडूस, दोंदे, वडगाव पाटोळे आदी गावांच्या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असून अनेक ठिकाण पशुधनावर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट व दहशतीचे वातावरण आहे. त्यातच बुधवारी (ता.२) सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास दोंदे येथे शेतात काम करणाऱ्या मोहन काळे यांच्यावर बिबट्या गुरगुरत चाल करण्याचा व भीमाजी बाबूराव सांडभोर यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात सांडभोर यांच्या तीन शेळ्या जागेवरच ठार झाल्या. वनविभागाला घटना कळल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व पशुधनाच्या नुकसानीचा पंचनामा केला. शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळवून देण्याचा विश्वास शेतकऱ्याला दिला. बिबट्याने दिवसाढवळ्या केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगरचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या नेतृत्वाखाली शिरोली वनपरिक्षेत्राचे वनपाल गुलाब मुके, वनरक्षक सागर तांबे, जगदीश वाघमारे, व्ही.डी.केदारी व वनसेवक मोराजी बढे यांनी परिसरात बिबट जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
लोखंडी पत्र्याचा आवाज करावा
शेतात काम करताना स्वतः जवळ किंवा हातात काठी किंवा तत्सम वस्तू हातात ठेवावी, वाहनचालकांनी रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना खबरदारी घ्यावी. लहान मुलांना एकटे सोडू नये. बिबट्या आढळल्यास बिबट्याच्या मागे धावू नये. फटाके वाजवावे किंवा लोखंडी पत्र्याचा आवाज करावा, असे आवाहन वनकर्मचारी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.