तीव्र पाणी टंचाईत भागविली गावाची तहान

तीव्र पाणी टंचाईत भागविली गावाची तहान

Published on

कडूस, ता. ११ : कडूस (ता.खेड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या काळात गावातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नामदेव ढमाले व कुटुंब ग्रामस्थांच्या मदतीला धावून आले. त्यांनी स्वतःच्या विहिरीतील उभ्या पिकांचे पाणी बंद करून ते ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले व गावाची तहान भागविली. तीव्र टंचाईच्या काळात ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबली.
कडूस परिसरातील पाण्याचा एकमेव आधार असलेला कुमंडला नदीवरील बंधारा पाण्याअभावी कोरडा ठणठणीत पडला आहे. यामुळे कडूस गावठाणासह शेंडेवाडी, मुसळेवाडी, गारगोटवाडी, पानमंदवाडी, अरगडे शिवार, धायबर शिवार व लगतच्या चार-पाच ठाकरवस्त्यांना शेती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. त्यातच गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण पाहून ग्रामस्थांच्या मदतीला नामदेव ढमाले व त्यांचा मुलगा उद्योजक उमेश ढमाले, खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष ढमाले, मीनानाथ ढमाले धावून आले आहे.


ग्रामस्थांनी समाधान व्यक्त
ढमाले कुटुबिंयांनी आपल्या शेतातील उभ्या पिकांचे पाणी बंद केले व ते गावकऱ्यांसाठी दिले आहे. ढमाले यांच्या विहिरीत मुबलक पाणी साठा आहे. हे पाणी विद्युत पंपाच्या सहाय्याने उचलून बाराशे फूट अंतरावर असलेल्या गावच्या नळ पाणीपुरवठा विहिरीत सोडले जात आहे. हे पाणी नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोचवले जात आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतीने सुद्धा सरपंच हेमलता खळदकर व ग्रामपंचायत अधिकारी सुरेश घनवट यांच्या नेतृत्वाखाली पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाइपलाइन व विद्युत पंपाची सोय करण्यात आली. ढमाले यांची परिसरात सुमारे चार एकर शेती आहे. त्यातील पिकांचे पाणी बंद करून गावासाठी पाण्याची सोय केल्याने नामदेव ढमाले, उमेश ढमाले, संतोष ढमाले, मीनानाथ ढमाले या शेतकऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

पाण्याच्या टँकरवर होणारा खर्चही वाचला
ढमाले कुटुंबाच्या औदार्यामुळे ग्रामपंचायतीचा पाण्याच्या टँकरवर होणारा हजारो रुपयांचा खर्चही वाचला आहे. या औदार्याबद्दल सरपंच हेमलता खळदकर यांनी ढमाले कुटुंबाचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करीत ऋण व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती किसन नेहेरे, हभप लक्ष्मण महाराज मुसळे, उद्योजक किशोर शेळके, बाळासाहेब पांगारे, मोहन गारगोटे, प्रकाश बोऱ्हाडे, भगवान ढमाले, अप्पा धायबर, आनंदा धानापुने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

01736

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com