खेडमधील अनेकांच्या उत्साहावर विरजण
कडूस, ता. १४ : खेड तालुक्यात मागील जिल्हा परिषद निवडणुकीवेळी सात गट होते. त्यात एकने वाढ होऊन तालुक्यात सध्या आठ गट निर्माण झाले आहेत. त्यातील चार गट महिलांसाठी आरक्षित झाले, त्यात तीन गट सर्वसाधारण व एक गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने तयारी केलेल्या अनेकांच्या ‘पुरुषी’ उत्साहावर विरजण पडले. आठ वर्षाच्या कालखंडानंतर निवडणूक होणार असल्याने ‘यंदा कर्तव्य आहेच’ या इराद्याने अनेक इच्छुक तयारीला लागले होते. प्रस्थापित पुढाऱ्यांनी तर मतदार संघात लावलेल्या फ्लेक्सवर आपल्या सोबत आपल्या पत्नीची छबी छापून ‘मी किंवा बायको’ निवडणुकीत आहेच, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वच गटांमधील निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
वाडा- वाशेरे जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. यातील बहुतांश गावे पूर्वीच्या नायफड- वाशेरे गटात होती. त्यावेळी भाजपचे अतुल देशमुख निवडून आले होते. मधल्या काळात देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. आता हा गट राखीव झाल्याने देशमुख यांना निवडणुकीसाठी दुसरा गट शोधावा लागणार आहे. याच गटातून एकदा स्वतः व एकदा पत्नी जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेल्या अरुण चांभारे यांचीसुद्धा संधी हुकली आहे. कडूस-चास जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे. पुन्हा एकदा मावळत्या जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांना संधी निर्माण झाली आहे. त्यांच्या समोर कोण आव्हान निर्माण करणार, याची नागरिकांना उत्सुकता आहे. विद्यमान आमदार बाबाजी काळे हे सांडभोरवाडी-काळूस गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले होते. या गटाची पुरती तोडफोड झाली. काही गावे कडूस- चास गटात, तर काही गावे मेदनकरवाडी- काळूस गटात गेली आहेत. खुद्द काळे यांचे गाव कडूस- चास गटात गेले आहे. नव्याने निर्मिती झालेला वाफगाव- रेटवडी गट सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी राक्षे यांना आठ वर्षानंतर पुन्हा संधी निर्माण झाली आहे. पिंपळगावतर्फे खेड-मरकळ गट सर्वसाधारण झाला आहे. मागील निवडणुकीत रेटवडी-पिंपळगावतर्फे खेड गटातून निर्मला पानसरे निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. पाईट-आंबेठाण गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. या गटावर मावळते जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांचे गेली वीस वर्षे प्राबल्य राहिले आहे. या गटातून ते स्वतः तीन वेळेस जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असताना एक पंचावार्षिक त्यांच्या समर्थक आदिवासी ठाकर समाजाच्या सुरेखा ठाकर बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत. या वेळेस बुट्टे पाटील त्यांच्या पत्नीला मैदानात उतरवून पाठबळ देणार, हे निश्चित आहे. गेल्या वेळेस कडूस- वाडा गटातून लढलेल्या अतुल देशमुख यांच्या पत्नी कल्पना देशमुख यांनी या गटातून लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. मेदनकरवाडी-काळूस गट ओबीसी प्रवर्गासाठी, तर नाणेकरवाडी-म्हाळुंगे गट सर्वसाधारण व कुरुळी-आळंदी ग्रामीण गट सर्वसाधारण महिला राखीव आहे. हा भाग चाकण व आळंदी शहरालगतचा भाग असल्याने निवडणुकीत पैशांचा वापर होण्याची चर्चा आहे. धनदांडगे निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समस्या
पाणी आणि रस्ते, चाकण व आळंदी परिसरातील वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण, विविध प्रकारचे शेत जमिनीवरील आरक्षण, भूसंपादन शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. धरणांतर्गत बुडीत बंधारे, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, पर्यटन विकास प्रयत्न.
गटनिहाय आरक्षण
वाडा- वाशेरे- अनुसूचित जमाती, कडूस-चास- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रेटवडी-वाफगाव- सर्वसाधारण महिला, पिंपळगाव- मरकळ- सर्वसाधारण, मेदनकरवाडी- काळूस- नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाईट- आंबेठाण- सर्वसाधारण महिला, नाणेकरवाडी- म्हाळुंगे- सर्वसाधारण, कुरुळी- आळंदी ग्रामीण- सर्वसाधारण महिला.
मागील पक्षीय बलाबल
शिवसेना- ३, भाजप- २, राष्ट्रवादी कॉंग्रेस- २
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.