रोहित्र चोरटे मस्त; खेडमधील यंत्रणा सुस्त
कडूस, ता. २५ : खेड तालुक्यात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. तालुक्यात विविध ठिकाणी एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत चोरीचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह नागरिक व व्यावसायिकांना सोसावा लागत आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही तपासाबाबत महावितरण आणि पोलिस यंत्रणेची मात्र सुस्त दिसून येत आहे. झटपट पैसे मिळण्यासाठी चोरटे विद्युत रोहित्रांना लक्ष करीत आहेत. चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे सर्वजण त्रस्त झाल्याची विदारक स्थिती सध्या तालुक्यात आहे.
खासगी कंत्राटदारावर गुन्हे दाखल होऊनही महावितरणने बसविलेल्या रोहित्राच्या जागी कोणतीही परवानगी न घेता परस्पर दुसरे खासगी रोहित्र बसवत ‘वरकड’ कमाई करणारी यंत्रणा तालुक्यात कार्यरत आहे. त्यामुळे रोहित्र चोरीबाबत संशयाची सुई महावितरणच्या संबंधातील काही खासगी कंत्राटदारांकडे वळत आहे. वीज रोहित्र फोडून त्यातील तांब्याची तार व ऑइल लांबवण्याचे प्रकार वाढल्याने सर्वजण हैराण झाले आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या रात्री वेताळे येथे साबुर्डी रस्त्याच्या बाजूच्या रोहित्रावर चोरट्यांनी हात मारला. रोहित्रांच्या चोऱ्यांमुळे विद्युत पुरवठा विस्कळित होत असल्याने ऐन कांदा लागवड हंगामात शेतकऱ्यांची विजेसाठी परवड होत आहे. कुक्कुटपालन व दूध उत्पादकांनासुद्धा वीज समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
दृष्टिक्षेपात
१. विजेअभावी मानवी वस्त्यांनजीक बिबट्याची धास्ती वाढली
२. चोऱ्यांमुळे रोहित्र उपलब्ध करून देणे महावितरणला कठीण
३. नवीन, दुसरे बदली रोहित्र उपलब्ध करून देण्यासाठी विलंब
४. ग्रामस्थांना बसावे लागते दिवसेंदिवस अंधारात
नळ पाणी पुरवठ्यावरही डल्ला
चोरट्यांच्या तडाख्यातून गावोगावच्या नळ पाणी पुरवठ्याचे सुद्धा विद्युत रोहित्र सुटलेली नाही. यात तीन ऑक्टोबरला वाकी गावच्या नळ पाणी पुरवठ्याच्या रोहित्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. दीपावली सणाच्या दिवसात ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. या अगोदर वाशेरे गावात तीन वेळा पाणीपुरवठ्याचे रोहित्र चोरट्यांनी चोरून नेले. कोये गावाचीही अशीच परिस्थिती आहे. सोलर पॅनल चोरण्याचे प्रकार सुद्धा वाढले आहेत.
दीपावली अंधारातच साजरी
खेड तालुक्यात एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत ५० ठिकाणच्या विद्युत रोहित्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यात चाकण उपविभागातील २७, राजगुरूनगर उपविभागातील १९ तर एमआयडीसीतील तीन ठिकाणच्या रोहित्रांचा समावेश आहे. चोरीच्या घटनांचा परिणाम गावगाड्यावर झाला आहे. काही ठिकाणी अजूनही बदली रोहित्र न मिळाल्याने काही गावच्या वस्त्यांना दीपावलीचा सण अंधारात साजरा करावा लागला.
महावितरणच्या उपकेंद्रनिहाय रोहित्र चोऱ्यांची आकडेवारी
राजगुरूनगर..........१४
भोसे..........१८
चाकण ग्रामीण..........५
कडूस..........५
आळंदी ग्रामीण..........३
निघोजे..........२
वासुली..........२
सोमाटणे..........१
रोहित्र चोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. जागेवर वेल्डिंग करण्याचा पर्याय वापरला आहे. काही काळ चोऱ्या कमी झाल्या
होत्या, परंतु आता चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. वेल्डिंग कटरने तोडत आहेत. गेल्या काही महिन्यात चोऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. पोलिसांनी चोरीची एफआयआर नोंद केली पाहिजे. काही ठिकाणी एफआयआर नोंद घ्यायला सुरुवात झाली आहे. टोळी पकडली जात नाही, तोपर्यंत चोऱ्या थांबणार नाहीत.
- केशव काळूमाळी, कार्यकारी अभियंता, राजगुरुनगर विभाग
02029
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

