मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय

मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय

Published on

मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय

खेड तालुक्यातील तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीतील मानापमान नाट्यावर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील पक्षीय रणनीती अवलंबून असणार आहे. पंचायत समितीसाठी इच्छुकांची मांदियाळी आहे. सध्या तरी पंचायत समिती निवडणुकीच्या बाबतीत माजी आमदार दिलीप मोहिते विरुद्ध आमदार बाबाजी काळे व सर्वपक्षीय, असाच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.

- महेंद्र शिंदे, कडूस

खेड पंचायत समिती सदस्यांची संख्या यंदा दोनने वाढ होऊन १६ झाली आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी तालुक्याचे आमदार सुरेश गोरे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या निवडणुकीत पंचायत समितीत चौदापैकी आठ सदस्य शिवसेनेचे होते. एक काँग्रेस व एक भाजपचा सदस्य सोबत होता. राष्ट्रवादी कॉग्रेसचे चार सदस्य विरोधात होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेश गोरे यांचा पराभव करून दिलीप मोहिते पुन्हा आमदार झाले. त्यांनी राज्याच्या सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या ताब्यातील पंचायत समितीतील सत्तेला सुरुंग लावला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही पूर्ण बहुमत असलेल्या शिवसेनेचे सहा सदस्य फोडले अन् पंचायत समितीची सत्ता काबीज केली. हे घडताना अनेक घडामोडी घडल्या. सभापतिपदाच्या खुर्चीवरील वादातून सभापती भगवान पोखरकर यांना तुरुंगात जावे लागले होते. हा विषय राज्याच्या राजकारणात गाजला. याचे किस्से शिवसेना पक्ष फुटीतही ऐकायला मिळाले. स्थानिक शिवसेनेचा पूर्वीच मोहिते यांना विरोध होताच, पण त्यानंतर तो अधिक टोकाचा झाला. तसाच शिवसेना सोडून गेलेल्या सदस्यांच्या बाबतीत राहिला आहे. हा विरोध अजूनही तसाच आहे. तत्कालीन शिवसेनेच्या आठ सदस्यांपैकी बहुतांश सदस्य सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत दिसत नाही. काही शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत, तर बहुतेक मोहिते यांच्यासोबत आहेत.
आता तालुक्याच्या आमदारपदाची सूत्रे बाबाजी काळे यांच्या रूपाने ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आली आहे. काळे आणि मोहिते यांच्यातील आरोप प्रत्यारोप तालुक्यातील जनतेला वेळोवेळी ऐकायला मिळत आहे. पंचायत समितीची सत्ता मिळविण्यासाठी दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. शिवसेना (शिंदे), शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपली भूमिका अजून उघड केलेली नाही. भाजप व राष्ट्रवादी काही ठिकाणी एकमेकांना साथ देतील, परंतु शिंदे यांच्या शिवसेनेचा राष्ट्रवादीला कट्टर विरोध राहणार, हे निश्चित. ठाकरे यांची शिवसेना सर्व जागा लढविण्याच्या मानसिकतेत आहे. भाजपतून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांची भूमिका महत्त्वाची आहे.
इच्छुकांची संख्या जास्त आहे. पंचायत समिती गणाकरिता सर्व पक्षांना आयात का होईना उमेदवार मिळणार याची खात्री आहे. सध्या तरी तालुक्यात युती व आघाडी धर्माचे पालन होईल, असे वाटत नाही. यामुळे तालुक्यात सर्व पक्ष जसे बळ मिळेल, तसे स्वबळावर ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतील. पंचायत समितीची निवडणूक लढाई खऱ्या अर्थाने माजी आमदार मोहिते यांच्या राजकीय अस्तित्वाची राहील. तशीच आमदार काळे यांच्या परिपक्वतेची दिसेल. मुख्य लढत मात्र मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय अशीच दिसेल.

समस्या
* रस्ते, आरोग्य, पाणी
* नळ पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे
* घनकचरा व्यवस्थापन
* वैयक्तिक लाभाच्या योजनांचे तेच तेच लाभार्थी.

मागील पक्षीय बलाबल
शिवसेना- ८, राष्ट्रवादी कॉंग्रेस- ४, भाजप- १, काँग्रेस- १.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com