उच्चशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व

उच्चशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व

Published on

उच्चशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व

दिनेश रमेश ओसवाल...राजगुरुनगर सहकारी बँकेचे उच्चशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व. वडील राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. रमेशशेठ ओसवाल यांच्याकडून मिळालेला समाजकारण आणि राजकारणाचा वसा आणि वारसा दिनेश ओसवाल यांनी अखंडितपणे सुरू ठेवला आहे. आपल्या गतिशील आणि कृतिशील निर्णयाने राजगुरुनगर सहकारी बँकेची आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भरभराटीच्या उंचीवर तर नेलेच, परंतु असंख्य गोरगरीब, होतकरू बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतर्गत अनुदान पात्र कर्ज योजनेचा लाभ मिळवून देत स्वतःच्या व्यवसायात उभे केले आहे. ‘दिनेश इलेक्ट्रॉनिक्स’च्या माध्यमातून व्यवसायात यशस्वी भरारी घेतल्यानंतर पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी खेडच्या समाजकारण आणि राजकारणात त्यांचे नाव पुढे येऊ लागले आहे.

- प्रतिनिधी

खेड तालुक्याच्या राजकारण आणि समाजकारणातील निःस्वार्थ माणूस म्हणजे स्व. रमेशशेठ ओसवाल. तालुक्याच्या पश्चिम भागातील गोरगरीब व गरजू लोकांचा आधार. समस्या कोणतीही असो, अडलेल्या नडलेल्या सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जायचा स्वभाव होता. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून तळागाळातील तरुणांना, शेतकऱ्यांना उद्योग व्यवसाय उभारणीला मदत केली. आपल्या वडिलांची ही सर्व गुणवैशिष्ट्ये दिनेश ओसवाल यांनी आत्मसात केली आहेत. दिनेश यांचे शालेय शिक्षण वेताळे गावीच झाले. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी. चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत तालुक्यात पहिला आलेला विद्यार्थी. विज्ञान शाखेतून बारावी केल्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी पुणे विद्यापीठातून घेतली. नावाजलेल्या आयटी कंपनीत नोकरी मिळाली, पण वडील स्व. रमेश ओसवाल यांच्याकडून मिळालेले समाजसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवायची ऊर्मी शांत बसून देत नव्हती.
मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या आग्रहाने दिनेश यांनी सन २००८मध्ये राजगुरुनगर सहकारी बँकेची निवडणूक लढविली. मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. बँकेच्या माध्यमातून समाजसेवेचा श्रीगणेशा झाला. ग्रामीण भागातील लोकांशी नाळ जुळलेली असल्याने कडूस, सायगाव, साबुर्डी, साकुर्डी, कडधे, कान्हेवाडी, कोहिंडे, वेताळे, वाशेरे, गारगोटेवाडी, रानमळा, आगरमाथा परिसरासह पश्चिम दुर्गम भागातील गोरगरिबांची कामे करता आली. पुढे सन २०१२मध्ये बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. बँकेच्या माध्यमातून समाजसेवा बजावताना सोबत घरची आर्थिक घडी सचोटी आणि चांगुलपणाने व्यवसाय करीत वाढवत नेली. तोकड्या भांडवलावर सुरू केलेल्या ‘दिनेश इलेक्ट्रॉनिक्स’ने अल्पावधीतच भरारी घेतली. यथावकाश फर्निचरचे दालन आणि एस.एस. मोबाईलची फ्रेंचायझीही मिळवली.

बॅंकेच्या प्रगतीची घोडदौड
दिनेश ओसवाल यांच्या व्यवसायाची घोडदौड सुरू होती, तरी बँकेच्या सेवेत कुठेही खंड नव्हता. संचालक मंडळाने सन २०२३मध्ये त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली. त्यांच्या कार्यकाळात बँकेची खऱ्याअर्थाने भरभराट झाली. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय २२०८ कोटी होता. तो ३१ मार्च २०२५अखेर २९०१ कोटींवर गेला, म्हणजे ७०० कोटींची व्यवसायाची वाढ झाली. बँकेने ४५ कोटींचा उच्चांकी ढोबळ नफा मिळविला. सन २०२३- २०२४ या आर्थिक वर्षातील ही प्रगतीची घोडदौड २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातही चालू राहिली. या वर्षात बँकेने त्यांच्या नेतृत्वाखाली आयडियल एनपीए कमी करण्याचे आव्हान स्वीकारले. ३१ मार्च २०२३ ला आयडियल एनपीए १५.५८ टक्के होता. तो ३१ मार्च २०२५ रोजी ६.८७ टक्क्यांवर आला आहे. म्हणजे हा एनपीए जवळपास ९ टक्क्यांनी कमी झाला. गेल्या कैक वर्षांतला हाही एका विक्रमच आहे. ओसवाल यांच्या कल्पक नेतृत्वाखाली बँकेने अनेक गोरगरिबांसाठी नवनवीन योजना सुरू केल्या. मुख्यतः समाजातील विविध घटकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतर्गत अनुदान पात्र कर्ज देण्याची मान्यता मिळविली. त्यामुळे राजगुरुनगर सहकारी बँक केंद्र शासनाच्या एमएसएमई अनुदानासाठी पात्र ठरलेली पुणे जिल्ह्यातील पहिली नागरी सहकारी बँक ठरली. नव्याने काही कर्ज योजनाही सुरू केल्या. या योजनांमध्ये शेतीपूरक कर्ज योजना आहे. जमीन सपाटीकरण, नवीन विहीर खोदाई, पाइपलाइन, विद्युत व सौर कृषी पंप, ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशिन,
मळणी यंत्र, शेतमाल गोडाऊन, शीतगृह, गोठा बांधकाम आदींकरिता कर्ज देण्यात येत आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.

कामाची पावती- बिनविरोध संचालक
दिनेश ओसवाल यांच्या कारकिर्दीत प्रथमच बँकेला महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचा सन २०२३- २४चा तृतीय व सन २०२४- २५चा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. आर्थिक संस्थेतील उत्तम कामगिरीबद्दल दिनेश ओसवाल यांना एप्रिल २०२५मध्ये ‘ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. अध्यक्षपदाच्या दमदार व जोमदार कामगिरीचा गौरव म्हणून सर्व बँकांची शिखर संस्था असलेल्या ‘पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन’वर ‘बिनविरोध संचालक’ म्हणून सर्वात कमी वयात निवड झाली. बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना दूध व्यवसाय उभारणीसाठी मदत करताना गोरगरिबांना मदत करून सामाजिक कार्यसुद्धा अखंडितपणे सुरू ठेवले. रक्तदान शिबिरासोबत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या हेतूने अनेक शाळांना स्मार्ट टीव्ही भेट दिले. हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना रोख स्वरूपाचे आर्थिक मदत केली. कोकणातील पूरग्रस्तांना रोख स्वरूपात आर्थिक साहाय्य पोच केले. बँकेच्या माध्यमातून तरुण व महिलांसाठी ठिकठिकाणी व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत.

दिनेश ओसवाल यांचे आगामी उपक्रम
- खेड तालुक्यातील सर्व गावांमध्ये वाचनालय सुरू करणे.
- कडूस, वाडा, पाईट अशा मोठ्या व मध्यवर्ती गावांच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, तसेच पोलिस व फौज भरतीसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करणे.
- वाड्यावस्त्यांवर व्यायामशाळा उभारणीसोबत भागातील उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या आदिवासी समाजातील तरुणांना मोफत मार्गदर्शनासाठी प्रयत्न करणे.
- महिलांसाठी आवडत्या क्षेत्रात रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य पुरविणे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्य चौकात बाकडे बसविणे.
- जास्तीत जास्त गोरगरीब व गरजूंना शासकीय स्तरावरील वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी वैयक्तिक स्तरावर शिबिरे घेणे.
- खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बांधवांचे राहणीमान सुधारण्यासाठी व आर्थिकस्तर उंचावण्यासाठी स्थानिकांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.

Marathi News Esakal
www.esakal.com