गारगोटवाडीत ‘ना हरकत’साठी पुन्हा ग्रामसभा

गारगोटवाडीत ‘ना हरकत’साठी पुन्हा ग्रामसभा

Published on

कडूस, ता. १३ : खाणपट्टा व खडी क्रशर व्यवसायासाठी गारगोटवाडी (ता. खेड) ग्रामसभेने यापूर्वीच नाकारलेल्या ‘ना हरकत’ दाखल्याची खातरजमा करण्यासाठी व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने व्यावसायिकाच्या बाजूने हस्तक्षेप करीत खेड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने गुरुवारी (ता. १५) विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. यापूर्वी याच कारणासाठी १८ सप्टेंबर रोजी महसूल प्रशासनाने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते, परंतु ही ग्रामसभा अचानक स्थगित केली होती.
​स्टोन क्रशर व्यवसाय, ड्रीलिंग व ब्लास्टिंग करून खाणकाम करणे, डांबर प्लांट, डिझेल व ऑईलचा साठा करणे, आरएमसी प्लांट, सोलर प्लांटसाठी गारगोटवाडी ग्रामपंचायतीकडे मावळ तालुक्यातील आंबळे येथील एका व्यावसायिकाने ‘ना हरकत’ दाखल्याची मागणी केली होती. परंतु, ग्रामसभेने खडी क्रशर व खाणकाम व्यवसायासाठी गावच्या हद्दीत कोणालाही ‘ना हरकत’ दाखला देऊ नये, असा ठराव पूर्वीच केला असल्याचे नमूद करीत संबंधित व्यावसायिकाला लेखी कळवून ग्रामपंचायतीने ‘ना हरकत’ दाखला नाकारला. यानंतर त्या व्यावसायिकाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी खेड महसूल विभागाला ग्रामसभेच्या ना हरकत दाखल्यासह व्यवसाय परवानगीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत पत्राद्वारे अवगत केले आहे. त्याच्या अनुषंगाने खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी गुरुवारी (ता. १५) गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे.
या ग्रामसभेत फक्त ड्रीलिंग व ब्लास्टिंग करून खाणकाम करणे, खाणपट्टा परवानगीवर चर्चा होणार आहे. या विषयावर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. ग्रामसभेचा पूर्वीचा ठराव स्पष्ट असतानाही जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाने पुन्हा त्याच विषयावर ग्रामसभा आयोजित केल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच प्रशासनाने ही विशेष ग्रामसभा १८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली होती, परंतु प्रशासकीय कामकाजाच्या कारणावरून प्रशासनाने ही ग्रामसभा रद्द केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत आपणहून याच कारणासाठी ग्रामसभेची मागणी केली होती. ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार ही ग्रामसभा २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली. यात ग्रामस्थांनी पुन्हा एकदा, ‘गावच्या हद्दीत खडी क्रशर व खाणपट्टा व्यवसायासाठी कोणालाही दाखला देण्यात येऊ नये,’ असा ठराव एकजुटीने मंजूर केला. आता पुन्हा एकदा प्रशासनाने ग्रामसभा आयोजित केली आहे. एकाच कारणासाठी पुन्हा पुन्हा ग्रामसभा होत असल्याने ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार ग्रामसभा होत असली तरीही प्रशासनाच्या भूमिकेबाबत गावात संभ्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com