कडूसमध्ये ‘महाकाल अघोरी’चा जिवंत देखावा
कडूस, ता. २० ः खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वात भव्य शिवजयंती उत्सव कडूस (ता. खेड) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या व विद्युत रोषणाईने नटवलेल्या स्वराज्य रथामधून शिवपुतळ्याची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील शिवकालीन मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांसह ‘महाकाल अघोरी’चा जिवंत देखावा शिवप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
कडूस पंचक्रोशीतील तरुणाई गेल्या नऊ वर्षांपासून ‘एक गाव एक शिवजयंती’ उपक्रम राबवीत आहे. हा उत्सव खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वात भव्य, दिव्य व देखणा शिवजयंती उत्सव ठरत आहे. गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात महिलांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रणरागिणींच्या मर्दानी खेळांनी मानवंदना देण्यात आली. गड-किल्ल्यांचे संवर्धन व स्त्रीशक्तीचा जागर याबाबत तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यात आले. मिरवणुकीत नऊवारी साडी, नाकात नथ व डोक्यावर भगवा फेटा असा मराठमोळा वेष परिधान केलेल्या महिला व तरुणींचा सहभाग उल्लेखनीय होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला. मिरवणुकीत ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करण्यात आली. लाठी-काठी व तलवारबाजीसह मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत चौकात विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या गावातील तरुण-तरुणींचा सन्मान करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या सामुदायिक आरतीने उत्सवाची सांगता झाली. पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सिसोदे व बीट अंमलदार संतोष घोलप यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संयुक्त शिवजयंती उत्सव समिती व कडूस पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी नियोजन केले होते.
02212, 02213, 02214
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

