उजनी बॅकवाॅटरचे ट्रान्सफार्मर सोडविले

उजनी बॅकवाॅटरचे ट्रान्सफार्मर सोडविले

''उजनी''च्या बॅकवॉटर परिसरात शेतकऱ्यांची तांराबळ

बिलांच्या वसुलीसाठी काढली १५० रोहित्रे; पुरवठा खंडित झाल्याने देता येईना पिकांना पाणी

पळसदेव, ता. ९ : उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील सुमारे १५० रोहित्र काढण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठी तारांबळ उडाली आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने पिकांना पाणी देता येत नाही. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वीज बिलांच्या वसूलीसाठी वीज कापण्याची भूमिका वीज कंपनीने घेतल्याने शेतकऱ्यांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

उन्हाळ्यातील चाऱ्याची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी चारा पिकांची पेरणी केली आहे. काहींनी कांदा, तरकारी यांसारखी नगदी पिके घेतली आहेत. याशिवाय तोडणी झालेल्या उसाच्या खोडव्याला व फळबागांनाही पाण्याची अत्यंत गरज आहे. उजनीत पाणी आहे, परंतु ते शेतात नेता येत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

सहा एकर शेतात कांद्याचे पीक घेतले आहे. त्याला पाण्याची गरज असताना वीज कापल्याने पिकाचे नुकसान होणार आहे. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा आम्हाला अनुभव आला आहे. वीज बिलांचे वाटप केलेले नसताना, वसूलीसाठी मात्र रोहित्र सोडविण्याची तत्परता त्यांनी दाखविली आहे. आम्हाला हातातले काम सोडून लोणी देवकर येथून वीज बिल घ्यावे लागले. प्रतिहॉर्सपॉवर एक हजार रुपये याप्रमाणे साडेसात हजार रुपये भरले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कर्मयोगी कारखान्याला ७०० टन ऊस गाळपासाठी दिला आहे. अद्यापपर्यंत एक रुपयाही बिल मिळाले नाही. वीज कंपनीने मात्र नेमकी तिसऱ्या महिन्यात वीज कापली. आता हजारों रुपये बिल कसे भरायचे?
- सुनील भोसले, शेतकरी रुई

वरिष्ठांच्या आदेशान्वये वीज बिलांच्या वसूलीसाठी १५० रोहित्र काढली आहेत. टप्प्याटप्प्याने सुमारे ६०० रोहित्र सोडविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी चालू बिल भरल्यास तत्काळ रोहित्र जोडण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांनी चालू बिल भरण्याचे आवाहन त्यांनी केले.
- पी. सी. जाधव, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com