वॉटर बँकेत एक हजार कोटी लिटरचा साठा

वॉटर बँकेत एक हजार कोटी लिटरचा साठा

कळस, ता. २९ : उन्हाळ्यात पिकांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी शेततळे शेतकऱ्यांसाठी वॉटर बँक ठरत आहे. यामुळे उन्हाळ्यात शाश्वत पाण्याची सोय होत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून शेततळे तयार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत कृषी विभागाच्या विविध योजनांतून इंदापूर तालुक्यात सुमारे दीड हजारांहून अधिक शेततळी तयार केली असून यातून अंदाजे एक हजार कोटी लिटर पाण साठविण्यात येत आहे.

नीरा नदीकाठचा पट्टा व उजनीच्या बॅक वॉटरलगतच्या परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे. मात्र, तालुक्याच्या आवर्षण प्रवण क्षेत्रात फळबाग लागवडीचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये द्राक्ष, डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्री, कागदी लिंबू, सीताफळ यांसारख्या फळबागांचा समावेश आहे. फळबागांची उन्हाळ्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची परवड होत होती. मात्र, शासनाच्या योजनांमधून मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या उभारणीस प्राधान्य दिले. मागेल त्याला शेततळे योजनेतून सुमारे एक हजार दीडशे व सामूहिक शेततळे योजनेतून साडेचारशे शेततळी उभारण्यात आली.

पावसाळ्यातील जास्तीचे पाणी, कालव्याचे आवर्तनातून ही शेततळी भरली जातात. उन्हाळ्यातील पिकांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी या शेततळ्यातील पाण्याचा मोठा उपयोग होत आहे.

आमच्याकडे शाश्‍वत पाण्यासाठी दोन कोटी लिटर व एक कोटी लिटर क्षमतेची दोन शेततळी आहे. यातून आमच्या शेतातील द्राक्ष, सीताफळ, कागदी लिंबू यांसारख्या सुमारे वीस एकर फळबागांना या शेततळ्याचा मोठा उपयोग होत आहे. मार्चपासून मे अखेरपर्यंत या शेततळ्यातील पाणी या पिकांना वापरता येते. द्राक्षाच्या खरड छाटणीच्यावेळी पाण्याची अत्यावश्यक गरज या शेततळ्यांच्या माध्यमातून भरून निघते. एकवेळ बँकेत पैसे नसले तरी चालते, परंतु वॉटर बँकेत (शेततळे) पाणी नसल्यावर ताण येतो.
- अॅड. दयानंद सांगळे, शेतकरी

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतंर्गत पिकांच्या संरक्षित पाण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळ्याला अनुदान दिले जाते. महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्जाची नोंदणी करणे गरजेचे आहे. तालुक्याला शेततळ्यांसाठी मिळणारे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
- भाऊसाहेब रूपनवर, तालुका कृषी अधिकारी


01837

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com