‘उजनी’च्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा संताप

‘उजनी’च्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा संताप

पळसदेव, ता. १० : सोलापूरची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी सुमारे ६००० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. यामुळे धरणालगत पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांसाठीच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढलेले असताना, दुसरीकडे उजनीतील आवर्तनामुळे पाणी पातळी खोलात जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उजनीलगतचे पंप पाण्याऐवजी गाळ उपसत आहेत. आता तो गाळही दुरावणार असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

औज व चिंचपूरच्या बंधारे भरण्यासाठी सुमारे ५ टीएमसीपर्यंत पाण्याचा वापर केला जाणार आहे. सध्या उजनी धरणामध्ये मृतसाठ्यात ३९.७२ टीएमसी पाणी आहे. यापैकी सुमारे ४ टीएमसी गाळ वगळता ३५ टीएमसी पाणी साठा वापरता येईल. यापैकी ४ ते ५ टीएमसी पाण्यातून सोलापूरची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी नदीपात्रातून पाणी सोडले आहे. एरवी पाण्याचे डोह असणारे नदीपात्र व इंदापूर, माळशिरस, पंढरपूर आदी भागातील नदीपात्रातील २० हून अधिक बंधारे कोरडेठाण पडले आहेत. हे सगळे डोह व बंधारे भरल्यानंतर पाणी पुढे जाणार आहे. यामुळे निश्चित पाणी किती लागेल हे सांगणे अवघड आहे.


धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्याचे कुठलेच नियोजन केले जात नसल्याचे वास्तव आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली उजनी धरणग्रस्तांचे हक्काचे पाणी पळविले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रपंच उद्‌द्धवस्त होण्याची वेळ आलेली आहे. सोलापूरला नदीतून पाणी नेण्यासाठी सोलापूरच्या सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रयत्न होतो. मात्र धरणग्रस्तांकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने, त्यांचे हक्काचे पाणी पळविले जात आहे.
- भूषण काळे, संचालक, कर्मयोगी साखर कारखाना

धरणग्रस्तांच्या समस्यांना वाली उरला नाही. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली धरण रिकामं करण्यात आले तरी धरणग्रस्तांच्या बाजूने एकही नेता ब्र शब्द काढत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही.
- अरविंद जगताप, अध्यक्ष, उजनी धरणग्रस्त बचाव कृती समिती

उजनी धरणातून ६००० क्यूसेकने पाणी सोडून ४ ते ५ टीएमसीदरम्यान पाण्यातून सोलापूरसाठीचे बंधारे भरण्याचे नियोजन आहे. यंदा वेळेत मॉन्सून सुरू होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.
- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी पाटबंधारे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com