इंदापूरकरवासीयांच्या तोंडचे पाणी पळविले
पळसदेव, ता. १९ ः पुणे व सोलापूर शहरांनी इंदापूरकरांच्या तोंडचे पाणी पळविल्याची तक्रार तालुक्यातील शेतकरी करत आहेत. एकीकडे खडकवासला कालव्याचे तालुक्याला नियमित आवर्तन मिळत नसल्याची तक्रार होत असताना, दुसरीकडे उजनीतून सोलापूरसाठी नदी पात्रात वारंवार बेकायदेशीरपणे पाणी सोडून धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
परिणामी खडकवासला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबर उजनीच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या धरणग्रस्तांचा शेती व्यवसाय पाण्याअभावी अडचणीत आला आहे. इंदापूरकरांच्या या हक्काच्या पाण्यातून या दोन्ही शहरवासीयांची घागर भरली जात असल्याने उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकऱ्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या समस्येत वाढ होत आहे. भविष्यात हक्काच्या पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांकडून उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उजनी धरणात सध्या ६३.८४ टक्के म्हणजे ९७.८७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी सुमारे ६४ टीएमसी पाणीसाठा हा मृत साठा आहे. तर ३४ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त पाणी साठा आहे. ३० जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मंगळवारी सकाळी ९ वाजता नदी पात्रातून १६०० क्युसेकने पाणी सोडले. यात वाढ करुन सायंकाळपर्यंत ४५०० क्युसेकने विसर्ग वाढविला होता. हा विसर्ग गरजेनुसार ६००० क्युसेसपर्यंत वाढविला जाणार आहे. यातून सोलापूर महापालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह इतर गावांच्या पाणी योजनांसाठी हे पाणी सोडले आहे. आगामी दहा दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असून, यासाठी सुमारे पाच टीएमसीपर्यंत पाणी वापरले जाणार आहे.
मात्र, धरणातून पावसाळ्यानंतर थेट उजनीत पाणी सोडण्याचा प्रकार बेकायदेशीर असल्याचा आरोप उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी केला आहे.
दरम्यान खडकवासला कालव्यातून रब्बीचे आवर्तन सुरू करण्याबाबतचा संदेश मिळाला. धरणातून पाणी सोडले जाणार आहे. धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचा संदेश प्राप्त झाला आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात पाणी कधी पोचेल, याबाबत नक्की सांगता येणार नाही. पाण्याचा विसर्ग व पाणी योजनांचा पाणी देण्याचा कार्यक्रम यावर तालुक्यात पाणी पोचण्याचे भवितव्य अवलंबून आहे.
- श्यामराव भोसले, प्रभारी उपविभागीय अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
खडकवासला कालव्याला पूर्ण क्षमतेने विसर्ग देवून सुरुवातीला इंदापुरातील सिंचन पूर्ण करणे गरजेचे आहे. ‘टेल टू हेड’ या पद्धतीने समन्यायी पाणी वाटप करणे गरजेचे आहे. इंदापूरकरांच्या अगोदर मध्येच दुसरीकडे पाणी वळविण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्याची आमची तयारी आहे.
- भरतराजे भोसले, अध्यक्ष, राष्ट्रवादी किसान सभा
‘आंदोलनाशिवाय पर्याय नाही’
पुण्याचे पाण्याचे लाड पुरविण्यासाठी इंदापूरकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू आहे. एकीकडे पुण्याला मुबलक पाणी दिले जाते, तर दुसरीकडे तेच पाणी प्रक्रिया करून शेतीला देण्याचे टाळले जात आहे. पुण्याने वापरलेले पाणी नदीद्वारे थेट उजनीत येते. हेच पाणी प्रक्रिया करून अथवा थेट उजनीतून उपसून शेतीला उपलब्ध करून दिल्यास बहुतांश प्रमाणात पाण्याची समस्या सुटेल. मात्र, यावर प्रशासन मूग गिळून गप्प आहे. यामुळे भविष्यात पाण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया बळिराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय गावडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

