

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचे पळसदेव हे इंदापूर तालुक्यातील प्राचीन काळातील गावांपैकी सुप्रसिद्ध गाव आहे. सुमारे एक हजार वर्षाचा संपन्न इतिहास या गावाला लाभलेला असल्याने गावाची वेगळी ओळख आहे. पुरातन काळात ‘रत्नपुरी नगरी’ म्हणून परिचित असलेल्या या सध्याच्या पळसदेव गावाने आपले ऐतिहासिक वैभव कायम जपले आहे. भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या पळसदेव गाव उजनी धरणामुळे विस्थापित झाले. गाव पुर्नवसित झाले, गावकऱ्यांनी नवी घरे बांधली, मंदिरे बांधली मात्र गावाचे ग्रामदैवत श्री पळसनाथाच्या प्राचीन मंदिराचे धार्मिक महत्त्व आजही कायम अबाधित आहे.
- सचिन लोंढे, पळसदेव
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ग्रामस्थांची ग्रामदैवत श्री पळसनाथावर अफाट श्रद्धा आहे. श्री पळसनाथाचे नव्या गावात नवे मंदिर बांधल्यानंतर, जुन्या गावातील प्राचीन स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचे दर्शन घडविणारे पुरातन मंदिर आजही सुस्थितीत आहे. या मंदिराने गावाचे नाव जगाच्या पर्यटनस्थळांच्या यादीत कोरले आहे. काळ बदलला, गाव बदलला, लोकांचे राहणीमान उंचावले. पुर्नवसित झालेल्या पळसदेव गावाने विस्थापिताची कात टाकून विकासाची झालर पांघरून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा चैत्र पौर्णिमेला देवाची यात्रा भरत आहे. यात्रेचा गुलाल अंगावर घेण्यासाठी वर्षभर कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या भूमीपुत्रांचे पाय गावाकडे वळत आहेत.
पुनर्वसनानंतर शेती हेच उत्पन्नाचे साधन असलेल्या गावाने आता शेतीशिवाय अन्य उद्योग- व्यवसायात चांगला जम बसविला आहे. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयामध्ये जुन्या पळसदेव गावालगत असलेले हजार वर्षांचे प्राचीन श्री पळसनाथाचे मंदिर ४५ वर्षे पाण्यात उभे राहून, वैभवशाली इतिहासाची भक्कमपणे आजही साक्ष देत जुन्या गावाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. गावाच्या एका बाजूला भीमा नदीची, तर दुसऱ्या बाजूला पुणे- सोलापूर महामार्गाची किनार लाभल्याने या गावाची विकासाची गती कायम वाढत राहिली आहे. उजनी धरणामध्ये संपादित होण्याअगोदर पळसदेव गावाची भली मोठी बाजारपेठ लगतच्या दहा- पंधरा गावांमध्ये प्रसिद्ध होती. या गावांतील लोकांसाठी पळसदेवचा मुख्य बाजार होता. त्यामुळे तालेवार गावांच्या यादीत पळसदेवचे नाव अग्रणी असे.
पुनर्वसनानंतर हरितक्रांती
उजनी धरण बांधणीपूर्वी भीमा नदीकाठची सुपीक आणि संपन्न जमीन हेच पळसदेव गावाचं उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. जुन्या काळामध्ये काही हातमाग, त्याचबरोबर अन्य उद्योग व्यवसायही या गावांमध्ये चालत असत. नदीच्या निर्मळ पाण्यावर आठमाही शेतीची पिके घेतली जात असतं. बारा बलुतेदार यांच्यासह सर्व जाती- धर्माचे लोक गुण्यागोविंदाने शेकडो वर्षापासून इथं वास्तव्यास असल्याची बाब गावाच्या एकात्मतेचा संपन्न इतिहास सांगणारी आहे. उजनी धरण झालं तसं यात गाव बुडालं अन् खऱ्या अर्थाने गावाचं गावपणच हरवलं. गाव, घरदार, जमिनी सारं काही भीमामाईच्या पोटात गिळंकृत झालं. जुन्या गावापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर माळरानावर ४५ वर्षांपूर्वी पळसदेव गावाचे पुनर्वसन झालं. उत्पन्नाचे सारे साधन पाण्यात गेलेले. राहायला घरे नाहीत. हाताला काम नाही. अशा परिस्थितीमध्ये पळसदेवकरांनी भक्कमपणे परिस्थितीचा सामना केला. बघताबघता वर्षे सरत गेली. आता पुनर्वसन होऊन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या पळसदेव ग्रामस्थांनी महत्प्रयासाने, जिद्दीने व कष्टाने पुन्हा एकदा नवं गाव नव्या रूपात नव्या दिमाखात उभा केलं आहे. माळवदात राहणारी कुटुंब बंगल्यात राहू लागली आहेत. उजनी पाणलोट क्षेत्रामुळे हरितक्रांती झालेल्या या गावाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
निमशहराकडे वाटचाल
गावातील पळसनाथ नं. १ व २ विकास सोसायटी, विठ्ठल विकास सोसायटी, काळेवाडी विकास सोसायटी, जिल्हा बँक,
आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून शेती व व्यवसायाशी संबंधित भांडवलासाठी आवश्यक अर्थ पुरवठ्याची सोय झाली आहे. पळसनाथ, गीता, श्रीनाथ या बिगरशेती पतसंस्थांचा व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत असलेली तत्परता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता, कर भरण्यासाठी सुरू केलेली आधुनिक प्रणालीमुळे येथे अनेकांचे वास्तव्य वाढीस आले आहे. या गावाची खेड्याकडून निमशहराकडे सुरू असलेल्या वाटचालीच्या झंझावाताला तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींसह इतर नेत्यांचे पाठबळ आहे. एकंदरीत गावच्या विकासास स्थानिक गावनेत्यांसह या संस्थांचा मोठा टेका आहे.
पोलिसांचा गाव
राजकीय, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिपथावर असलेल्या या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गावातील पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे पळसनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडीयम व ज्युनिअर कॉलेज या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गावासह परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय निर्माण झाली आहे. गावातील अनेक तरुण पोलिस दलात सेवेत आहेत. पोलिस दलातील सेवा बजावणाऱ्यांची संख्या विचारात घेता हा पोलिसांचा गाव असल्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याशिवाय अन्य विविध क्षेत्रात तरुण-तरुणींनी भरारी घेतली आहे.
गावाची आख्यायिका
भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या पळसदेव गावाला पुरातन काळात रत्नपुरी तर इंदापूरला इंद्रपुरी या नावाने ओळखले जात होते. या ठिकाणी नहुष नावाच्या राज्याने ९९ यज्ञ केले होते. शंभरावा यज्ञ झाला असता, तर काशीसारखे पवित्र तीर्थस्थान याठिकाणी निर्माण झाले असते. मात्र, या राज्याला इंद्रायणीला प्राप्त करून घेण्याची दुर्बुद्धी सुचली आणि त्याने त्या नादात ऋषी-मुनींना त्रास देण्यास सुरवात केली. त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्या राजाला शाप दिला. शीर मनुष्याचे, तर धड सापाचे, याने शापित झालेला राजा साप होऊन या परिसरात वावरत होता, अशी आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते. याशिवाय इंद्रायणीने या राजाला तू सरडा बनून राहशील असा शाप दिल्यामुळे तो सरडा बनून येथे पडल्याने या ठिकाणाला सरडेश्वर म्हणूनही संबोधल्याचे काहीजण सांगतात.
प्राचीन मंदिराचे स्वरूप
पळसनाथाचे मंदिर चुना आणि भाजलेल्या विटांमधून बांधण्यात आले आहे. पाया पाषाणी शिळांच्या आधारावर उभा आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. यावरती व्याल, पज्ञपत्र, स्तंभशाखा, वेलीशाखा, वाद्यसहित गंधर्व आणि सुरसुंदरी आहेत. विरगळ, भग्ननंदी, भग्नमारुती, दशावतार, शिल्पपट, सतीशिला पाषाणावर कोरलेल्या आहेत. काही अवशेष पडलेल्या अवस्थेत आहेत. तर येथील शिळांमधून सप्तसूर निघत असल्याचे बोलले जाते. मंदिराच्या पूर्वेकडील बाजूला काशिनाथ आणि विश्वनाथाची दोन मंदिरे आहेत. ती कायम पाण्याखाली असतात. दगडी मंदिरावर कोरलेल्या शिल्पकला अप्रतिम आहेत.
बुडालेल्या मंदिराचे दुष्काळात दर्शन
उजनी धरणाच्या बांधणीनंतर सन १९७५ मध्ये जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली. यानंतर २४ वर्षांनंतर सन २००२ मध्ये मंदिर प्रथमच पूर्णपणे उघडे पडले होते. यानंतर २०१३, २०१७, २०२३, २०२४ मध्ये मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. धरणनिर्मितीपासून आतापर्यंतच्या काळात मंदिर पाचवेळा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे. ज्या वर्षी दुष्काळ पडला, त्या वेळी बुडालेले पळसदेव गाव व गावाच्या गावखुणा पाण्याबाहेर आल्याचे यातून स्पष्ट होत आहे. जुन्या गावाभोवती तट व तटाला भट, नाथ, चांभार आणि मुख्य चार वेशी होत्या. गावाच्या पश्चिमेला ग्रामदैवत पळसनाथाचे प्राचीन दुर्मिळ सप्तभूमीज पद्धतीचे मंदिर आहे. गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर ग्रामस्थांनी पळसनाथाचे पुनर्वसित गावात नव्याने मंदिर बांधले आहे. प्राचीन मंदिरातील शिवलिंग मंदिर पाण्यात जाण्यापूर्वीच ग्रामस्थांनी हलवून नवीन मंदिरात स्थापना केली. शिवाय काही प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. नव्या गावात मोठ्या दिमाखात दरवर्षी देवाची यात्रा भरते.
स्थापत्य कलेच्या सामर्थ्याचे दर्शन
पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, प्राचीन स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचे दर्शन घडविते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे मंदिर आहे. ग्रामदैवत पळसनाथाचे प्राचीन मंदिर, बलीचे मंदिर, काशी विश्वनाथाचे मंदिर येथे पाहण्यासारखे आहे. मंदिरावरील शिलालेख, सप्तभुमिज शिखर, मंदिर गाभाऱ्यातील कोरीव शिला, उन्हाच्या चटक्यातही अल्हाददायक गारवा देणाऱ्या मंदिर परिसरातील ओवऱ्या, सप्तसुरांची निर्मिती होणाऱ्या शिला, काशी विश्वनाथ मंदिरावरील रामायणाचा दाखला देणाऱ्या शिला शिल्पे, सतीची शिल्पे, वीरगळ यांसारख्या अनेक प्राचीन शिला, शिल्पे व विरगळी येथे पाहता येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.