खडकवासला कालव्यावरील सिंचनाचा बट्ट्याबोळ
कळस, ता. १५ : इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याचे आवर्तन वीस दिवस सुरू ठेवूनही कालव्याचे पाणी टेलला पोचलेच नाही. आवर्तन काळात वीज बंद केली तर शेतकऱ्यांचे पाइप फोडले. वितरिकांना पाणी सोडण्याचे टाळण्यात आले. काही तासांसाठी केवळ दाखविण्यापुरते पाणी सोडण्यात आले. इंदापूरकरांच्या वाटणीचे पाणी कमी का झाले? असा सवाल कळस (ता. इंदापूर) येथे झालेल्या बैठकीत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
कळस ग्रामपंचायतीच्या सभागृहात खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पंकज हुलसुरे, शाखा अभियंता श्यामराव भोसले यांनी नुकत्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी खडकवासला कालवा व वितरिकांच्या आवर्तनाबाबत तक्रारींचा पाढाच वाचला. येथील मुख्य कालवा, त्यावरील ४८, ४९ व ५० क्रमांकाच्या वितरिकेतून पाणी सोडण्यात होणारा दुजाभाव, वितरिकांची दुरवस्था यांसह अन्य काही समस्या उपस्थित अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या. सध्याची पाण्याची गरज ओळखून तातडीने इंदापूरसाठी आवर्तन सुरू करण्याची आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली तसेच इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील सिंचन व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाल्याचे सांगत, जाणीवपूर्वक कालव्याच्या पाण्यापासून डावलण्यात आल्याचा आरोप केला.
इंदापूर तालुक्याचा सिंचन कालावधी कमी करण्यात आल्याने, पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. वितरिकांच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपये खर्चाची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यानंतर वितरण व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.
- पंकज हुलसुरे, उपविभागीय अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग
शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या
१. आवर्तन काळात शेतकऱ्यांची वीज बंद केली जाते.
२. कालव्यात आलेले पाणी उपसण्यावर निर्बंध घातले जातात.
३. शेतकऱ्याचे पाइप फोडले जातात.
४. वितरिकांना केवळ दाखविण्यापुरते तास-दोन तास पाणी सोडले जाते.
५. यासाठी खासगी यंत्रणेची मदत घेतली जाते. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो.
६. वितरिकांना पाणी येत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
शेतकऱ्यांकडून सामुदायिक आत्मदहनाचा इशारा
एकीकडे इंदापूर तालुक्याची शीव ओलांडल्यावर शेतकऱ्यांना पाणी घेण्यावर निर्बंध घातले जातात. तर दुसरीकडे बारामती, दौंड, हवेली तालुक्यात इंदापूरला पाणी पोचण्याअगोदर बेसुमार पाणी उपसा कसा सुरू असतो. या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले. एकंदरीत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला कालव्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा थेट आरोप उपस्थितांनी केला. यावर तातडीने सुधारणा न झाल्यास सिंचन भवन येथे सामुदायिक आत्मदहन करण्याचा तोंडी इशारा शेतकऱ्यांनी दिला.
तलावात पाणी सोडण्यास टाळाटाळ
कळस गावातील तलावात पाणी सोडण्याबाबत प्रत्येक आवर्तनाला ग्रामपंचायतीकडून पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार केला जातो. मात्र, यावेळी या तलावात पाणी सोडण्याचे टाळण्यात आले. यानंतर क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी कैफियत मांडली. यावेळी मंत्री भरणे यांनी व्हिडिओ कॉलव्दारे सदर तलाव भरण्याची सूचना करत वितरिकांना तीन दिवस आवर्तन देण्याची सूचना केली. मात्र, मंत्र्यांच्या सूचनेनंतरही तलाव भरण्याचे टाळत
वितरिकेला दोन तास पाणी सोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
02966
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

