कळसमार्गे एसटी सेवा सुरू करण्याची मागणी
कळस, ता. ७ ः कळस (ता. इंदापूर) येथून प्रवासासाठी एकाही एसटी बसची सोय नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एसटी अभावी परिसरातील १० ते १२ गावे व वाड्यावस्त्यांवरील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांची गरज ओळखून इंदापूर आगाराकडे कळस ग्रामपंचायतीने एसटी सेवा सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यांच्या पत्राला आगार प्रमुखांनी केराची टोपली दाखवली आहे. क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मोबाईलवरून आगारप्रमुखांना एसटी सुरू करण्याची सूचना दिली होती. मात्र, मंत्र्यांची सूचनाही कानाडोळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण दीड वर्षांचा कालावधी उलटला तरी आगारप्रमुखांनी या गावाला एकही एसटी बस दिली नाही. कळस गाव गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या सेवेपासून वंचित आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित हा प्रश्न सोडविण्याची नितांत गरज असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
काही वर्षांपूर्वी जंक्शन- भिगवण, इंदापूर- बारामती शटल सेवा, तर इंदापूर- पुणे, नगर- शिखर शिंगणापूर या लांब पल्ल्याच्या एसटी बस या मार्गावरील ये- जा करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत कार्यरत होत्या. यामुळे कळस गावासह रूई, न्हावी, अकोले, डाळज, शेळगाव, कडबनवाडी, लाकडी, बोरी, काझड, जंक्शन, वालचंदनगर, भिगवण, बारामती, इंदापूर आदी गावांतील प्रवाशांची सोय झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या सर्व मार्गावरील एसटी सेवा बंद केली आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, महिला प्रवासी व ज्येष्ठ ग्रामस्थांची मोठी परवड होत आहे. दरम्यान, इंदापूरचे आगार प्रमुख हनुमंत गोसावी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
डाळज येथे थांबा, मात्र प्रवासी घेण्यास नकार
पुणे- सोलापूर महामार्गावर पुणे, सोलापूर शहरांकडे जाणाऱ्या एसटी बससाठी प्रवाशांना कळसपासून ६ किलोमीटर अंतरावर डाळज क्रमांक २ येथे जावे लागते. मात्र, तिथे पुणे व सोलापूरकडे जाणारी एकही बस थांबत नाही. तिथे असलेल्या एका ढाब्यावर एसटीचा अधिकृत थांबा असल्याचा फलक आहे. मात्र, प्रवासी घेण्यास वाहक साफ नकार देतात. विनंती करून एखाद- दुसरा प्रवासी घेतला तर प्रवाशाला मागील १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसदेव गावाचे तिकीट घ्यावे लागते. यातून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. एसटी महामंडळाने ढाब्यावर थांबा मंजूर केला आहे. तसेच दोन्ही बाजूच्या एसटी गाड्यांसाठी येथे विनंती थांबा मंजूर करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.