वाचाळवीर नेत्यांचे तत्काळ निलंबन करा
कळस, ता. १२ - एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सत्तेतील आमदार, मंत्री बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्यापासून ते कर्जमाफीचा नाद लागला आहे, असे म्हणत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सत्तेतील नेत्यांनी केला आहे. या वाचाळवीर नेत्यांचे तत्काळ निलंबन करून आगामी २० वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय गावडे यांनी केली.
ते म्हणाले, यंदा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. अवकाळी व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आलेल्या संकटाला तोंड देत शेतकरी कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मदत मिळण्यास किती कालावधी लागेल हे निश्चित नाही. वर्षाचे अर्थकारण कोलमडले आहे. यंदाचे नुकसान शेतकऱ्यांना दहा वर्षे मागे घेऊन जाणारे आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांचे अवसान गळून गेले आहे. शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था झालेली असताना सरकारमधील मंत्री मात्र बेताल वक्तव्य करून तोंडसुख घेत आहेत.
निवडणुकीदरम्यान कर्जमाफीचा जाहीरनामा काढून मते मागितलेल्या नेत्यांना, आपण शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलोय याचे भान राहिले नाही. यामुळे त्यांच्या मनात शेतकऱ्यांप्रति फसवी आस्था असल्याचे समोर आले आहे. यामुळे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे गावडे यांनी सांगितले.