श्रद्धा, पर्यटन आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम : पुणे-सोलापूर महामार्ग

श्रद्धा, पर्यटन आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम : पुणे-सोलापूर महामार्ग

Published on

राज्यातील काही रस्ते केवळ शहरांना जोडत नाहीत तर ते श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्माला एकत्र बांधतात. असाच राज्यातील महत्त्वाचा महामार्ग म्हणजे पुणे-सोलापूर महामार्ग...! गेल्या कित्येक वर्षांपासून हा महामार्ग श्रध्दा, पर्यटन व अध्यात्माच्या त्रिवेणी संगमातून भक्तीचा मार्ग म्हणून परिचित झाला आहे.
- सचिन लोंढे, पळसदेव

विद्येचे माहेरघर म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पुणे शहराला जोडणारा, तेथून पुढे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पोचलेला, तर राज्याच्या शेवटच्या टोकावरील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहराला व तेथून पुढे हैदराबादला जोडलेल्या या मार्गावर अनेक धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत. पुण्यालगतचे भीमाशंकर येथील शिवलिंग, इंदापूर तालुक्यातील नीरा-नरसिंगपूर येथील श्री लक्ष्मी- नृसिंह मंदिर, सोलापूरलगतच्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांची कर्मभूमी, गाणगापूर येथील श्री दत्त मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांबरोबर पुणे-सोलापूर सीमेवरील उजनी धरणातील स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी उपलब्ध असलेले पर्यटनस्थळ यामुळे या महामार्गाची वेगळी ओळख आहे.

धार्मिक पर्यटनाचा महत्त्वाचा दुवा
पुण्यापासून सुरू होणारा हा मार्ग वारकरी परंपरेचा कणा मानला जातो. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात लाखो वारकरी याच मार्गाने पंढरपूरकडे निघतात. ‘ज्ञानोबा–तुकाराम’च्या गजरात हा महामार्ग भक्तीने न्हाऊन निघतो. मात्र वारीच्या पलीकडेही हा मार्ग वर्षभर श्रद्धेने गजबजलेला असतो. कारण याच मार्गावर राज्यातील तीन महान दैवतस्थाने वसलेली आहेत. पंढरपूरच्या वारीमुळे ओळखला जाणारा हा मार्ग आज भक्तीबरोबरच धार्मिक पर्यटनाचा महत्त्वाचा दुवा बनत आहे. या मार्गावर असलेली तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट ही तीन महान श्रद्धास्थाने भक्ती आणि पर्यटनाचा समृद्ध अनुभव देतात.


तुळजापूर : शक्ती उपासनेचे तेजस्वी केंद्र
सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर हे श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र स्थान. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी मातेने दिलेली तलवार ही कथा केवळ इतिहास नाही, तर मराठी मनाच्या श्रद्धेचा भाग आहे. नवरात्र, पौर्णिमा, शुक्रवारच्या दिवशी तुळजापूर भक्तांनी फुलून जाते. मंदिर परिसर, घाट, प्रसाद, स्थानिक बाजारपेठ हे सर्व भक्ती आणि पर्यटनाचा सुंदर अनुभव देतात. तुळजापूरला येणारा भक्त केवळ दर्शन घेऊन जात नाही, तर तो इतिहास, श्रद्धा आणि शक्ती उपासनेचा ठेवा अनुभवतो.

गाणगापूर : दत्तभक्तीचे पवित्र क्षेत्र
पुणे–सोलापूर मार्गावरून पुढे गेले की गाणगापूर हे दत्त संप्रदायाचे अत्यंत पवित्र स्थान लागते. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी दत्तभक्तीचे केंद्र मानले जाते.
अमृतवाहिनी आणि भीमा नदीच्या संगमावर वसलेले गाणगापूर आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. येथे येणारे भक्त पूजा, प्रदक्षिणा, साधनेत अंतर्मुख होतात. यामुळे गाणगापूर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र बनले आहे.

अक्कलकोट : स्वामी समर्थांची कर्मभूमी
सोलापूर जिल्ह्यातीलच अक्कलकोट हे धार्मिक पर्यटनाचा महत्त्वाचा दुवा स्वामी समर्थ महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा स्वामी समर्थांचा संदेश आजही भक्तांना आधार देतो. अक्कलकोटमधील समाधी मंदिर, वटवृक्ष, जुनी गल्लीतली मंदिरे हे सर्व भक्तीला मानवी स्पर्श देतात. येथे येणारे भाविक केवळ दर्शनासाठी नाही, तर मानसिक समाधान आणि श्रद्धेचा आधार घेण्यासाठी येतात.

नीरा-नरसिंगपूर : श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर
इंदापूर तालुक्यातील नीरा-नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील
अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. हे देवस्थान भक्त प्रल्हादाची तपोभूमी व पृथ्वीचे नाभीस्थान म्हणूनही परिचित आहे. नीरा आणि भीमा या दोन पवित्र नद्यांचा संगम येथे असल्याने या ठिकाणाला ‘दक्षिण प्रयाग’ असेही संबोधले जाते. यामुळे येथे वर्षभर विविध धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. नुकताच या भागाचा विकास करण्यात आला आहे.

भीमाशंकर : सहावे ज्योतिर्लिंग
जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले भीमाशंकर हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग मानले जाते. राज्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या भीमा नदीचा उगम याच मंदिर परिसरातून होतो. येथील मंदिर प्राचीन नागर शैलीचे कलाकुसरीतून घडविलेले प्राचीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला दाट जंगलाने वेढलेले आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेली मोठी खार म्हणजे ‘शेकरू’ या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्गसौंदर्य आणि ‘कोकण कडा’ पाहण्यासाठी पर्यटक आणि ट्रेकर्स मोठ्या संख्येने येत असतात.

विकास व विस्तार काळाची गरज
तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, भिमाशंकर, नीरा-नरसिंगपूर ही ठिकाणे पुणे–सोलापूर महामार्गामुळे जोडली गेली आहेत. यामुळे एकाच प्रवासात अनेक श्रद्धास्थाने पाहण्याची संधी भाविकांना मिळते. आज अनेक कुटुंबे हा प्रवास भक्तीबरोबरच पर्यटन म्हणून आखतात. दर्शन, प्रसाद, स्थानिक खाद्यपदार्थ, बाजारपेठा, निवास व्यवस्था, निसर्ग पर्यटन या सगळ्यामुळे धार्मिक पर्यटनाचा विस्तार होण्यास मोठा वाव आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग असल्याने महामार्गाचा विकास व विस्तार काळाची गरज आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
सोलापूरच्या भक्ती मार्गामुळे स्थानिक भागातील अर्थव्यवस्था सशक्त होत आहे. हॉटेल, प्रवास सेवा, पूजा साहित्य विक्रेते व स्थानिक उत्पादन विक्रेत्यांना या मार्गामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. भक्तीमुळे निर्माण होणारे पर्यटन हे ज्या-त्या भागातील रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहे. भक्ती मार्ग म्हणून या महामार्गाचे महत्त्व वाढत असताना स्वच्छता, वाहतूक नियोजन, पर्यावरण संवर्धन याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. भाविक, स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन या श्रद्धामार्गावर पवित्रता आणि शिस्त जपली पाहिजे.

भक्ती मार्गातून विकासाची संधी
पुणे–सोलापूर महामार्गाला केवळ वाहतुकीचा मार्ग न मानता, भक्ती व धार्मिक पर्यटन मार्ग म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. राज्यासह परराज्यातील प्रवाशांनाही येथील संत परंपरा, दैवतस्थाने यांची माहिती देणारे फलक, विश्रांती केंद्रांच्या निर्मितीची गरज आहे. पुणे–सोलापूर भक्ती मार्ग हा श्रद्धेचा, इतिहासाचा आणि अध्यात्माचा जिवंत प्रवाह आहे. तुळजापूरची शक्ती उपासना, गाणगापूरची दत्तभक्ती आणि अक्कलकोटची स्वामी समर्थांची करुणा या तिन्हींचा संगम या मार्गाला अनोखी ओळख देतो. भक्ती आणि पर्यटन यांचा हा सुंदर मेळ जपला, तर हा मार्ग महाराष्ट्राच्या धार्मिक पर्यटनाचा आदर्श मार्ग ठरेल.

03203

.............

..... बातमीदार .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com