उजनी धरणामुळे मच्छीमारांना आत्मसन्मान

उजनी धरणामुळे मच्छीमारांना आत्मसन्मान

Published on

उजनी धरण म्हणजे केवळ पाण्याचा साठा नव्हे तर राज्यातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. राज्यातील गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणातील चिलापी, रोहू, कटला, मिरगल यांसारखे चवदार मासे राज्यासह परराज्यातील चोखंदळ खवय्यांच्या ताटात पोचले आहेत. या यशवंत सागरात मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छीमार कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळाल्याने त्यांच्या आयुष्यात आत्मसन्मान व स्थैर्य प्राप्त झाले आहे.
- सचिन लोंढे, पळसदेव

उजनी धरणात मासेमारी करणारी सुमारे चार हजार मच्छिमारांची कुटुंबे, अडीच हजार व्यापारी, वाहन मालक-चालक, हॉटेल कामगार ते मालक, बर्फाचे कारखाने, जाळी निर्मिती यांसारख्या मासेमारी व त्याच्याशी संबंधित व्यवसायावर सुमारे दीड ते दोन लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे. यातून वर्षभरात दीडशे कोटींहून अधिकची उलाढाल होत आहे.


भीमा नदीवर पुणे-सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सन १९७६ मध्ये बांधण्यात आलेल्या उजनी धरणामुळे अनेकांना विस्थापित व्हावे लागले. अनेकांना धरणासाठी शेतजमिनींचा त्याग करावा लागला. यानंतर धरणातील पाण्याचा जेवढा शेतीसाठी फायदा झाला तेवढाच फायदा औद्योगिकरणाबरोबर मच्छिमारांनाही झाला आहे. .........

मासेमारीसाठी पहाटेपासून धावपळ
उजनी धरणाच्या काठावर पहाटेची शांतता फार काळ टिकत नाही. सूर्य उगवण्याआधीच मच्छीमार आपल्या नौका पाण्यात उतरवतात. जाळी टाकली जाते, पाण्यावर हलकी लाट उठते आणि काही वेळातच मासळीची चकाकी दिसू लागते. हा क्षण केवळ मासेमारीचा नसून दिवसाच्या कमाईचा आणि कुटुंबाच्या भविष्याचा असतो. या धरणातून दररोज सुमारे २० ते २५ टन मासे पकडले जातात. भिगवण व इंदापूर येथील मासळी बाजारात हे मासे लिलाव पद्धतीने विकले जातात. यामध्ये चिलापी, रोहू, कटला, गुगळी, शिंगटा, मरळ, वाम यांसारख्या माशांचा समावेश असतो. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांकडून दररोज माशांना मोठी मागणी आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत भिगवण व इंदापूर या शहरांच्या परिसरात दररोज ताजे मासे बनवून ग्राहकांना खाऊ घालणारी शेकडो हॉटेल आहेत. या हॉटेलसाठी दररोज दहा टनांपर्यंत मासे विकले जातात.

उजनीच्या माशांना खवय्यांची खास पसंती
उजनी धरणातील माशांची बाजारात वेगळी ओळख आहे. रोहू, कटला, मृगळ, गवत्या, मरळ, वाम, गुगळी, शिंगटा अशा गोड्या पाण्यातील माशांना खवय्यांची विशेष पसंती आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर येथील हॉटेल्स आणि घरगुती स्वयंपाकघरांत ‘उजनीचे मासे’ म्हणजे चवीची खात्री मानली जाते. कालवण असो, तवा फ्राय असो किंवा पारंपरिक माशांचा रस्सा असो, या सगळ्यांची चव वेगळीच असल्याचे खवय्ये आवर्जून सांगतात. जिल्ह्याबाहेरच्या पाहुण्यांचा पाहुणचार आवर्जून उजनीतील माशांचा बेत करून होतो. तर अनेकजण उजनीचे मासे खाण्यासाठी आवर्जून भिगवण, इंदापूर परिसरात सर्रास येत असतात.

धरणातून थेट बाजारात
उजनीतील मासेमारी हा केवळ धरणापुरता मर्यादित व्यवसाय नाही. मासे पकडल्यानंतर त्यांची वर्गवारी, बर्फात साठवण, वाहतूक आणि विक्री अशी एक मोठी साखळी कार्यरत आहे. या साखळीत व्यापारी, वाहतूकदार, हमाल, विक्रेते व मच्छीमार यांचा समावेश आहे. यांना आता हक्काचा रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे ताजी मासळी कमी वेळेत शहरांपर्यंत पोहोचवली जात असल्याने खवय्यांना दर्जेदार व ताजे मासे मिळण्याबरोबर मच्छीमारांना घामाचा योग्य दाम मिळत असल्याचे मच्छीमार सांगतात. या धरणावर अनेकजण पारंपारिक पद्धतीने पिढीजात मच्छीमारीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्यासाठी उजनीतील मासेमारी स्वयंरोजगाराचे साधन बनली आहे. काही ठिकाणी सहकारी संस्थांच्या माध्यमातून उद्योजकता विकसित होत आहे. काही मच्छीमार फक्त मासे पकडण्यापुरते
मर्यादित न राहता, सुके मासे तयार करणे, थेट ग्राहकांना विकणे अशा नव्या वाटा शोधत आहेत. शासनाच्या मत्स्य विभागाकडून स्थानिकांना प्रशिक्षण देण्याबरोबर भांडवल उपलब्ध करून दिल्यास या व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप देता येणे शक्य आहे.

महिलांचे योगदान मोठे
उजनीतील मासेमारी व्यवसायात महिलांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. मासे पकडण्यासाठी जाळे टाकणारा तो आणि होडी वल्हवणारी ती हे चित्र सर्रास यशवंत सागरात पहावयास मिळत आहे. मासेमारीसाठी नवऱ्याच्या खांद्यालाखांदा देऊन घाम गाळणाऱ्या अर्धांगिणीच्या सहकार्यातून अनेक कुटुंबांचा प्रापंचिक गाडा सुरळीत चालला आहे. पकडलेले माशांची स्वच्छता, वर्गवारी, विक्रीची जबाबदारी अनेक ठिकाणी महिला सांभाळत असल्याचे दिसून येते. यामुळे हा व्यवसाय कुटुंबकेंद्रीत उद्योगातून उत्पन्न मिळवणारा व्यवसाय बनला आहे.

देशी माशांच्या संवर्धनाची गरज
उजनीला गेल्या काही वर्षांपासून जलप्रदुषणाचे ग्रहण लागले आहे. परिणामी पाण्यातील माशांचे नैसर्गिक आश्रयस्थान असलेले पाणगवत जवळपास नष्ट झाले आहे. यामुळे धरणातील अनेक माशांच्या देशी जाती नामशेष झाल्या आहेत. तर काही मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. खदरा, तांबऱ्या, शेंगळ, सुंबर यांसारख्या देशी जातीचे मासे नामशेष झाले आहेत. तर वाम, मरळ, शिंगटा, गुगळी हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रोहू, कटला, गवत्या, मृगल यांचे अस्तित्व धोक्यात आलेले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मच्छिमार संघटनेचे नेत भरत मल्लाव व सहकाऱ्यांनी केलेल्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पुढाकारातून उजनीत शासनाच्या माध्यमातून मत्यबीज सोडण्याची मोहीम हाती घेतल्याने आता रोहू, कटला, मृगल यांसारखा कार्प जातीचे मासे मच्छिमारांना मिळू लागले आहेत. मत्सबीज सोडण्याबरोबर जलप्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांनी गरज असल्याचे मच्छीमार सांगत आहेत.

माशांना खवय्यांची वाढती मागणी
उजनीतील माशांना खवय्यांची वाढती मागणी आणि बाजारपेठेतील संधी यामुळे मासेमारी व्यवसाय विस्तारतो आहे. मात्र या माशांच्या संवर्धनाचे भान राखणेही तितकेच गरजेचे आहे. योग्य प्रमाणात मासेमारी, लहान मासळी पकडण्यास बंदी यांसारख्या नियमांचे पालन आणि पाण्याच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले तरच उजनीतील मासळीची चव आणि उपलब्धता टिकून राहू शकते.

उजनीतील मासे ब्रँड होऊ शकतो
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक व्यावसायिकांनी स्वतःच्या उत्पादनाचा व सेवेचा ब्रँड तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर उजनीतील माशांचा एक ब्रँड तयार करण्याची संधी मच्छिमारांना आहे. धरणातील माशांची वेगळी चव असल्याने बाजारात या माशांना कायम मागणी आहे. राज्यासह परराज्यातही या माशांचे असंख्य ग्राहक आहे. ग्राहकांची भूक ओळखून योग्य पॅकेजिंग, प्रक्रिया उद्योगातून ‘उजनी फिश’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली, तर हा ब्रँड देशाच्या कानाकोपऱ्यात सहज पोचू शकतो. यातून मच्छीमारांचे उत्पन्न काढण्याबरोबर उजनीची ओळख अधिक व्यापक होण्यास मदत होईल.

उजनी धरणातील मासेमारी ही खवय्यांच्या जिभेला चवीचा आनंद देणारी आणि मच्छीमारांच्या आयुष्याची शिदोरी आहे. हा परंपरागत व्यवसाय आणि माशांच्या प्रजाती जपल्या तर उजनी धरण भविष्यातही महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार राहील.


03205, 03207, 03206

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com