

पळसदेव, ता. २९ : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन तलाव सध्या देशी-विदेशी पक्षांच्या आगमनाने गजबजून गेला आहे. विशेषतः देखण्या ‘चित्रबलाक’ पक्षांनी येथे विणीच्या हंगामासाठी मोठी लगबग सुरू केली असून, तलावातील दाट बाभळीच्या झाडांवर आपली घरटी थाटली आहेत. निसर्गप्रेमी आणि पक्षीअभ्यासकांसाठी हे विलोभनीय दृश्य आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
पक्षांची सुरक्षित वसाहत
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढताच उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात चित्रबलाकांचे आगमन होते. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पक्षी भादलवाडी तलावातील पाण्याने वेढलेल्या काटेरी बाभळीच्या झाडांची निवड करतात. सध्या तलावात मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे वसाहतीसाठी पाण्यातील या काटेरी झाडांवर शेकडो चित्रबलाकांची आपली घरटी बांधण्याची लगबग सुरू आहे. काही मादी पक्षांनी अंडी घातल्याचेही दिसून येत आहे. नर आणि मादी पक्षी मिळून घरटे बांधणी व पिलांच्या संगोपनाची तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काही महिने या पक्षांचा मुक्काम येथे असतो. येथील घरट्यात पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्यांचे संगोपन केले जाते. तलावातील खाद्यान्न पिल्लांना पुरविले जाते. यानंतर पिल्लांच्या पंखात बळ आल्यावर हे पक्षी येथून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात.
पर्यटकांची मांदियाळी
उजनीच्या बॅकवॉटरप्रमाणे भादलवाडीचा तलावही पक्षी पर्यटनासाठी नावारूपास आला आहे. ब्रिटिशकालीन बांधकाम असलेला हा तलाव चित्रबलाकांमुळे जगाच्या नकाशावर पोचला आहे. या तलावातील दाट काटेरी झाडी व त्यावर चित्रबलाक, राखी बगळे, पाण कावळांची वसाहत यामुळे येथील जैवविविधता उजनीवर येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. सध्या येथे चित्रबलाकांसोबतच येथे राखी बगळा, करकोचा, शेकाट्या, विविध प्रकारचे पाणबदक, पाणकावळे व काही शिकारी पक्षी पाहायला मिळत आहेत.
तलाव संवर्धनाची गरज
भादलवाडी तलाव हा चित्रबलाकांसाठी अत्यंत सुरक्षित अधिवास मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून येथे पक्षांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, तलाव व त्यातील काटेरी झाडांचे संवर्धन काळाची गरज बनले आहे. याशिवाय तलावातील पाणीसाठा कायम वसाहतीच्या झाडांपर्यंत राखला जाईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी वेळोवेळी खडकवासला कालव्याच्या आवर्तनातून पाणी सोडण्याची गरज आहे. उजनीवर येणाऱ्या पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी भादलवाडी तलाव हेही आकर्षणाचे ठिकाण असल्याचे पक्षी निरीक्षक दत्तात्रेय लांघी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.