कळसमध्ये सायंकाळी भोरड्यांचा किलबिलाट
कळस, ता. २ : युरोपातून सुमारे पाच हजार किलोमीटर लांबीचा प्रवास करून हजारोंच्या संख्येने भोरड्या (रोझी स्टार्लिंग्ज) इंदापूर तालुक्यात दाखल झाल्या आहेत. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी खाद्यान्नाच्या शोधात दिवसभराचा भिरभिराट संपल्यानंतर, भोरड्यांचे काही थवे कळस (ता. इंदापूर) परिसरातील दाट काटेरी झाडीवर विसावत आहेत. रात्रीच्या मुक्कामासाठी विसावण्याअगोदर मावळतीच्या आकाशातील सोनेरी प्रकाशात चालणारी भोरड्यांची कवायत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या काही वर्षांपासून कळस परिसरात भोरड्यांचा मुक्काम होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाही भोरड्यांनी येथे मुक्कामासाठी हजेरी लावल्याने, कवायतींचे नयनरम्य दृष्य पाहणीची पर्वणी स्थानिकांबरोबर पक्षिनिरीक्षकांनाही लाभत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झालेल्या या भोरड्यांचा एप्रिल-मे महिन्यापर्यंत मुक्काम असतो. रात्रीच्या मुक्कामासाठी भोरड्यांनी गावातील निर्जन पडक्या वाड्यांतील उंच काटेरी झुडपांचा आधार घेतल्याचे दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा येथे मुक्कामासाठी आलेल्या भोरड्यांची संख्या कमी आढळून येत आहे. याशिवाय रात्रीच्या मुक्कामासाठी गतवर्षीपर्यंत ठरलेली गावातील झुडपे यंदा बदलली असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामदैवत हरणेश्वर मंदिराजवळच्या काही ठिकाणी भोरड्यांचे थवे विभागून विसावत आहेत.
किलबिलाटातून शत्रूला ताकदीचे दर्शन
सध्या गावात सायंकाळच्या वेळेत भोरड्यांचे भिरभिरणारे थवे किलबिलाट करत अचानक झडप घातलेल्या अवस्थेत एका ठिकाणी बसतात. सर्व पक्षी एकसंगतीने बसण्याची त्यांची कसब आकर्षक दिसते. मुक्कामाअगोदर हे पक्षी उथळ पाण्याच्या ठिकाणी अंघोळ करतात. यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी उंच आकाशात त्यांची कवायत असते. आकाशातून भुर्रकन उडणारे थवे एकत्रित येत मोठ्या आवाजात किलबिलाट करतात. यातून शत्रूला त्यांच्या ताकदीचे दर्शन घडवितात. त्यांच्या या वर्तनामुळे झाडावरील इतर पक्षी आपली जागा बदलतात. कवायतीदरम्यान या थव्यांमध्ये भोरड्यांचे अनेक छोटे-मोठे थवे सहभागी होतात. रात्रीचा मुक्काम संपला की, सकाळी खाद्यान्नाच्या शोधात भोरड्या आपल्या सोईनुसार छोट्या-छोट्या थव्यात विभागणी करून निघून जातात.
तालुक्यात भोरड्यांसाठी मुबलक खाद्यान्न
ज्वारी, कीटक, छोटी फळे हे भोरड्यांचे खाद्यान्न आहे. तालुक्यातील उजनीलगतचा बागायत पट्टा व माळरानावरील गवताळ भागातील मुबलक किटक, तोडणी अवस्थेत असलेले द्राक्षाचे शेकडो हेक्टर क्षेत्र हे भोरड्यांना मुबलक खाद्यान्न उपलब्ध करून देत आहे. याशिवाय गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे रानफळांची उपलब्धता या पक्षांसाठी पर्वणी आहे. या पक्ष्यांकडून बीज प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व पिकांना नुकसान पोचवणाऱ्या कीटकांचा खाद्यान्नात वापर होत असल्याने या पक्ष्यांना शेतकऱ्यांचा मित्र समजले जाते.
भोरड्यांचा मुक्काम म्हणजे समृध्द जैवविविधता
पक्षी निरीक्षक दत्तात्रेय लांघी म्हणाले, उजनीच्या बॅकवॉटरमुळे इंदापूर तालुक्यात शेकडो प्रजातीचे पक्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतर करत असतात. दरवर्षी येणाऱ्या पक्षांमध्ये भोरड्यांचा समावेश कायम आहे. हे तालुक्यातील समृध्द जैवविविधतेचे दर्शन घडविते. भोरड्यांना मुबलक प्रमाणात मिळणारे खाद्यान्न, मुक्कामासाठी उपलब्ध असलेली सुरक्षित ठिकाणं यामुळे त्यांना शत्रूपासून अभय मिळते. परिणामी त्यांनी निश्चित केलेली मुक्कामाची सुरक्षित ठिकाणांची दरवर्षी निवड होणं स्वाभाविक आहे. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणांचे संवर्धन करण्याची जबाबदारी समाजाची व गावाची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

