खडकवासलाच्या इंदापूर उपविभागात कर्मचाऱ्यांचा दुष्काळ
पळसदेव, ता. ५ ः खडकवासला पाटबंधारे विभागाच्या इंदापूर उपविभागात कर्मचाऱ्यांचा दुष्काळ पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या जिवावर पाटबंधारे विभागाचा कारभार सुरू आहे. नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. एकूण ८० मंजूर पदांपैकी केवळ १२ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, ६८ पदे रिक्त आहेत. एकीकडे कालव्याच्या पाण्याची वाणवा, तर दुसरीकडे संबंधित विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा दुष्काळ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसह बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकडूनही इंदापूरच्या नियुक्तीबाबत नको रे बाबा अशीच भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
इंदापूर तालुक्यात सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्र हे खडकवासला कालव्याचे लाभक्षेत्र आहे. मात्र, आवर्तनाच्या अनिश्चिततेमुळे प्रत्यक्ष सिंचित होणारे क्षेत्र हे केवळ १० ते १५ टक्क्यांवर आले आहे. कालव्याच्या पाण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वती राहिली नसल्याने अनेकांनी सिंचनासाठी वेगळे पर्याय निवडले आहेत. मात्र, निवडलेले पर्याय कायमस्वरूपी उपयोगी ठरण्याची शक्यता कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिथे कालव्याला पाणीच येत नसेल तेथे कर्मचाऱ्यांची तरी नियुक्ती कशाला हवी? असा वरिष्ठांकडूनही अघोषित निर्णय झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. कारण गेल्या काही वर्षांपासून खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा गाडा केवळ १२ जणांकडून चालविला जात आहे. कर्मचाऱ्यांशिवाय कार्यालय व पाण्याविना कालवा, असे चित्र सध्या निर्माण झाले असल्याने यात बदल होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
इंदापूर तालुका हा खडकवासला कालव्याचा टेलचा तालुका आहे. येथे तालुक्याच्या ठिकाणी खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत कालव्याचा सुमारे ५६ किलोमीटर लांबीचा टप्पा येतो. याशिवाय कालव्याला २६ वितरिका, ४ शाखा आहेत. इंदापूर, लोणी- देवकर, शेटफळगढे, पळसदेव येथे शाखा कार्यालये आहेत. खरीप, रब्बी व उन्हाळी आवर्तनाच्या काळात शेतकऱ्यांना पाणी वितरण करणे, पाणी पट्टी वसूल करणे, शेतकऱ्यांना पाणी पास देणे, अनधिकृत पाणी उपसा रोखणे यासारख्या कामकाजासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते.
मात्र, उपविभागांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुष्काळाची दखल अद्याप वरिष्ठ पातळीवरून घेतली नसल्याचे दिसून येत आहे. या उपविभागांतर्गत ५ शाखा अभियंता पदांची गरज असताना, केवळ १ शाखा अभियंता कार्यरत आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या ४ पैकी २ जागा रिक्त आहेत. इतर पदांच्या बाबतीत तर याहून भयाण परिस्थिती आहे. कालवा निरीक्षकाच्या ३२ पैकी ३० जागा रिक्त आहेत. तर मोजणीदाराच्या १४ पैकी १२ जागा रिक्त आहेत. कालवा चौकीदाराच्या ९ पैकी ८ जागा तर संदेशकाच्या संपूर्ण ५ जागा रिक्त आहेत.
कर्मचारी संख्या
पदे - संख्या मंजूर कार्यरत रिक्त
शाखा अभियंता - ५ १ ४
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - ४ २ २
दप्तर कारकून - ९ ३ ६
संदेशक - ५ ० ५
कालवा निरीक्षक - ३२ २ ३०
मोजणीदार - १४ २ १२
कालवा चौकीदार- ९ १ ८
एकूण - ८० १२ ६८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

