

पळसदेव, ता. १२ ः प्राचीन धार्मिक इतिहास लाभलेल्या पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत पळसनाथ मंदिराला करण्यात आलेल्या रंगरंगोटीमुळे झळाळी प्राप्त झाली आहे. मंदिरावरील कोरीव नक्षीकामात विविध रंग भरण्यात आल्याने मंदिराचे आकर्षण वाढले आहे. उजनी धरणामुळे गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर प्राचीन पळसनाथ मंदिरातील शिवलिंगाची नवीन गावठाणात नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात स्थापना करण्यात आली. यामुळे मंदिर बदलले तरी ग्रामस्थांची देवावरील श्रद्धा कायम आहे.
ग्रामदैवत पळसनाथ मंदिराचे शिखर हे आध्यात्मिकतेचे प्रतीक मानले जाते. ते आकाशाकडे झेपावणारे असल्यामुळे भक्ती, श्रद्धा आणि मोक्षाचा मार्ग दर्शवते. पळसनाथ हे नाव भगवान शिवाशी संबंधित असल्याने मंदिरात शिवलिंग स्थापित आहे. शिवमंदिरांमध्ये शिखराला विशेष महत्त्व असते कारण ते कैलास पर्वताचे प्रतीक मानले जाते. अशा भव्य मंदिराचे रंगकाम हे गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागातून करण्यात आले आहे. यामुळे सामाजिक आणि धार्मिक एकात्मता मजबूत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. १९८६ ते १९८८ दरम्यान बांधण्यात आलेल्या या मंदिराचे शिखर हे गोपुरम शैलीचे आहे. शिखर शिंगणापूरच्या महादेव मंदिराचे शिखर बांधलेल्या, तमिळनाडू राज्यातील शिखर कारागीर एन. सन्मुख सुंदरम यांच्या टीमने सुमारे ७३ हजार रुपये मजुरी घेऊन बहुमजली (टप्प्याटप्प्याने वर जाणारे) शिखर उभारले आहे. या शिखराची रचना दक्षिण भारतीय द्रविड शैलीची आहे. रंगीत शिल्पकला, शिखरावर विविध देव-देवतांच्या सुमारे १४४ मूर्ती, कोरीवकाम आणि आकर्षक रंगसंगतीमुळे मंदिर नेत्रदीपक वाटते. शिखरावर गणेश, विष्णू, देवी, शिवपरिवार अशा विविध प्रतिमा दिसतात. प्रत्येक स्तरावर लहान मंडप व मूर्ती बसवलेल्या आहेत. सर्वांत वरती सुवर्णकलश आहे, तो गावाचा समृद्धी व पूर्णत्वाचे प्रतीक मानला जातो. शिखराची उंची भक्ताला ईश्वराकडे पाहण्यास प्रेरित करते. सध्या ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून रंगकाम केले जात आहे. यासाठी आठ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत केल्याने आतापर्यंत नऊ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली आहे. यातून रंगकामाबरोबर मंदिर परिसरात बगीचा तयार केला जाणार आहे. मंदिराच्या रंगकामामुळे गावातील एकात्मता सिद्ध झाली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
ग्रामदैवत श्री पळसनाथ मंदिर बांधणी : १९८६ - १९८८ दरम्यान
मंदिरासाठी बारामती तालुक्यातील पणदरे येथून पाषाण दगड आणला
बारामतीचे प्रसिद्ध वास्तुविशारद शहा यांनी मंदिराचे डिझाइन तयार केले
शिखरावर नाजूक कलाकुसर व आकर्षक १४४ मूर्तींचा समावेश
पळसनाथाचे कुरण (देवस्थान मालकीची जमीन) धरणात गेल्याने मिळालेल्या मोबदल्यात मंदिराचे काम पूर्ण
मंदिराची उंची सुमारे ५१ फूट
आतापर्यंत जमा झालेली लोक वर्गणी सुमारे नऊ लाख
रंगरंगोटीसाठी मजुरी : दोन लाख
रंग खरेदी : सहा लाखांपर्यंत
मंदिर परिसरात बगीचा तयार केला जाणार आहे
3383
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.