पिवळ्या-काळ्या द्राक्षांना मिळणार सोनेरी भाव
कळस, ता. १९ : पवित्र रमजान महिन्यामुळे आखाती देशांसह देशांतर्गत बाजारपेठेतून द्राक्षाची मागणी वाढली आहे. एकीकडे द्राक्षाचा हंगाम ५० टक्क्यांपर्यंत उरकला आहे तर दुसरीकडे द्राक्षाची मागणी वाढली आहे. द्राक्षाचे बाजारभाव वधारण्याची संधी निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेतील पिवळ्या-काळ्या द्राक्ष घडांना सोनेरी भाव मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीची घाई न करता थोडं सबुरीने घेण्याचा सल्ला बाजारभाव जाणकारांकडून दिला जात आहे.
द्राक्ष बागांच्या छाटणीदरम्यान निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे यंदा उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यामुळे द्राक्ष हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले. यानंतर थंडीचा कडाका वाढल्याने भावात किंचित घसरण झाली. परंतु सध्या बाजारात द्राक्षांचा तुटवडा जाणवत असून, रमजान सणामुळे द्राक्षाच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्यासाठी सध्या व्यापाऱ्यांची पावले द्राक्ष बागांकडे वळली आहेत. तोडणीस आलेल्या अनेक बागांची आगाऊ नोंदणी केली जात आहे.
इंदापूर तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. दरवर्षी द्राक्षाच्या माध्यमातून २०० कोटींहून अधिकची उलाढाल होत असते. तालुक्यातून दुबई, मलेशिया, थायलंड, चीन आदी देशांमध्ये द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांकरवी निर्यात होत असते. दरवर्षी सरासरी १५ ते २० हजार टन द्राक्ष परदेशात पाठविली जाते. याशिवाय देशातंर्गत बाजारपेठेतही येथील द्राक्षे जातात. परदेशात येथील ब्लॅक जंबो वाणाला चांगली मागणी असते.
गेल्या चार दिवसांपूर्वीचे द्राक्षाचे बाजारभाव सध्या वधारले आहेत. रमजान सणामुळे द्राक्षाची परदेशातून व देशांतर्गत मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दराने द्राक्ष विक्रीची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.
- गणेश सांगळे, मानद सचिव
राज्य द्राक्ष बागायतदार संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

