उजनीच्या पाणलोटक्षेत्रात फ्लेमिंगोंची मांदियाळी
पळसदेव, ता. २३ : हजारो मैलांचा प्रवास करून येणाऱ्या रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे उजनी धरणाच्या (यशवंतसागर) पाणलोटक्षेत्रात आगमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यंदा पक्षी येतील का नाही याची धास्ती लागून राहिलेल्या व फ्लेमिंगोंच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या पक्षी निरीक्षक, पर्यटक, अभ्यासकांना आता दिलासा मिळाला आहे.
सध्या सुमारे शंभर ते दीडशेच्या संख्येने दाखल झालेल्या रोहित पक्ष्यांचे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, डिकसळ भागात दर्शन होत आहे. येथील उजनीच्या पाणलोटक्षेत्रातील दलदलीच्या ठिकाणी हे पक्षी कवायत करताना दिसून येत आहेत. येत्या आठवडाभरात पक्षांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पक्षी निरीक्षक व्यक्त करत आहेत.
साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारीच्या सुरुवातीला येणाऱ्या या पाहुण्यांनी यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात हजेरी लावली आहे. गतवर्षी लांबलेल्या परतीच्या पावसामुळे धरण गेल्या आठवड्यापर्यंत तुडुंब होते. परिणामी या पक्ष्यांसाठी आवश्यक असलेल्या उथळ पाण्याची व दलदलीची ठिकाणं तयार झाली नव्हती. अशा परिस्थितीत या पक्षांना खाद्यान्न मिळेनासे होते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून धरणातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडले जात असल्याने, पात्रात ठिकठिकाणी दलदलीचे भाग तयार झाले आहेत. यामध्ये या पक्ष्यांना त्यांचे आवडते खाद्य मिळणे सोईचे झाल्याने या पक्षांचे थवे यशवंत सागरात उतरू लागले आहेत.
फ्लेमिंगो पक्षी प्रामुख्याने सायबेरिया, कच्छचे रण आणि आफ्रिकेतून स्थलांतर करून येतात. उजनीच्या उथळ पाण्यातील दलदलीच्या ठिकाणी शेवाळ व जलचर, कीटक, छोटे मासे हे त्यांचे खाद्य आहे. आमचा समूह गेल्या दहा वर्षांपासून उजनीच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पाणपक्षी निरीक्षण व छायाचित्रणासाठी येतो. यंदा खूप उशिराने फ्लेमिंगो येण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब पक्षी निरीक्षक व पर्यटकांसाठी आनंदाची बाब आहे.
- संजीव फडतरे, पक्षी निरीक्षक
कवायत पाहण्याचे वेगळेच नेत्रसुख
उजनीला पाणथळ पक्ष्यांचे महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाते. येथे प्रत्येक वर्षी नव्याने काही पक्षी पाहायला मिळतात. परंतु उजनीच्या किनाऱ्याचे खास आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे निरीक्षण व त्यांची कवायत कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे तसेच पाहण्याचे वेगळेच नेत्रसुख मिळते, असे पक्षी निरीक्षक संजीव फडतरे यांनी सांगितले.
पक्ष्यांमुळे हक्काचा रोजगार प्राप्त
कुंभारगाव येथील क्रांती फ्लेमिंगो पाईंटचे दत्ता नगर म्हणाले की, उजनीवर येणाऱ्या पक्ष्यांमुळे येथील स्थानिक नौकाविहार व हाॅटेल व्यावसायिकांना हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे. यंदा नियमित वेळेपेक्षा उशिराने फ्लेमिंगो पक्ष्यांनी हजेरी लावली. मात्र आतापर्यंत उजनीवर फ्लेमिंगो नसल्याने पर्यटक व पक्षी निरीक्षकांनीही गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाठ फिरविली होती. आता धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने, येत्या काही दिवसांत येथे पक्ष्यांची संख्या कमालीची वाढलेली असेल.
03430, 03431
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

