इंदापुरात पाटबंधारे विभाग ॲक्शन मोडवर

इंदापुरात पाटबंधारे विभाग ॲक्शन मोडवर

Published on

कळस, ता. १ : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या शेवटच्या टोकाला शेती सिंचनाचे आवर्तन पोचविण्यासाठी सध्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. कालव्यातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी कार्यकारी अभियंता किरण देशमुख हे सहकाऱ्यांसमवेत कालव्याला भेट देवून पाहणी करत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी कालवा परिसरात जमाबंदी लागू केली असून, आवर्तन सुरळीत पार पाडण्यासाठी कालवा परिसरात गस्तीपथकाची नेमणूक केली आहे. परिणामी तालुक्यातील पाण्याचा येवा वाढल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, तालुक्यात किती दिवस पाणी सुरु राहील व किती टीएमसी पाणी देण्याची तरतूद केली आहे या प्रश्नावर मात्र अधिकाऱ्यांकडून मौन बाळगले जात आहे.
खडकवासला कालव्यातून बुधवारी (ता. १८) शेती सिंचनासाठी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. सुमारे ११०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ते मजल-दरमजल करत इंदापूर तालुक्यात पोचले आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने टेलला असलेल्या इंदापूर तालुक्यामध्ये पाणी पोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. कालव्याच्या शेवटच्या टोकाला पाणी पोचले की कालवा बंद करण्यात येत असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत. तालुक्यातील ५४ किलोमीटर लांबीचा टप्पा पार करण्यासाठी कालव्याच्या पाण्याला आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. पाणी शेवटच्या टोकाला पोचले की कालव्याचे पाणी बारामती, दौंडमध्ये दिले जाते. यामुळे मिळेल तेवढे चार-दोन दिवस पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते.

सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून धरणातील सहा टीएमसी पाणी संपूर्ण कालवा लाभक्षेत्रात सिंचनासाठी उपलब्ध करून दिले आहे. कालवा परिसरात जमाबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय वीज वितरण कंपनीला कळवून वीज बंद केली आहे. गस्ती पथकाच्या माध्यमातून गस्त घालण्याचे काम सुरू आहे. आवर्तन सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आम्ही कालवा परिसराला भेट देवून पाहणी करत आहोत. इंदापूरला प्राधान्याने पाणी पोचविण्याचा उद्देश आहे. अनधिकृतपणे वितरिकेचे गेट तोडण्याच्या घटना घडल्या आहेत. तेथे अज्ञातांविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यात आलेली आहे.
- किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभागा

‘कालव्याचे पाणी केवळ दाखविण्यापुरते’
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली वणवे म्हणाले की, खडकवासला कालव्याचे पाणी केवळ दाखविण्यापुरते तालुक्याला दिले जात असल्याचा अनुभव आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकाला पाणी पोचविण्यासाठी इंदापूर तालुक्यातच कारवाईचा बडगा उगारला जातो. तालुक्याच्या वाटणीचे पाणी विकले जात असून, शेतकऱ्यांना मात्र नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडीत खडकवासला कालव्याची दुरुस्ती व सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी काहीच उपाययोजना झाली नसल्याचे वास्तव आहे. यामुळे खडकवासला कालव्यालगतचा शेतकरी कर्जबाजारी झाला असून, अनेकांनी बेभरवशी पाण्यामुळे जमिनी विकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com