

पळसदेव, ता. १२ ः भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन वारसा लाभलेला तलावावर सध्या नवागत चिमुकल्या पाहुण्यांचा किलबिलाट वाढला आहे. येथे विणीच्या हंगामासाठी काटेरी झुडुपांवर थाटलेली घरटी चिमुकल्या पिल्लांनी फुलली असल्याचे चित्र दिसत आहे. एका घरट्यात दोन ते चार पिल्ले सर्रास पाहायला मिळत असून, त्यांच्या संगोपनासाठी चित्रबलाक पक्ष्यांची सुरू असलेली लगबग ‘याची देही याची डोळा’ अनुभवयास मिळत आहे.
तलावातील काटेरी झाडींवर चित्रबलाक, पाणकावळे, राखी बगळे यांसारख्या पक्ष्यांनी विणीच्या हंगामासाठी घरटी थाटल्याचे दिसून येत आहे. काटेरी झाडांखाली तलावातील पाणी असल्याने, या झाडांवर पक्ष्यांंना विणीचा हंगाम उरकणे सुरक्षित वाटते. यामुळे दरवर्षी येथे हजारोंच्या संख्येने पक्षी दाखल होतात. उजनीच्या पाणलोटक्षेत्रापासून जवळच असलेल्या या ब्रिटिशकालीन तलावाला या पक्ष्यांमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा येथे पाणकावळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. चित्रबलाक, पाणकावळे, राखी बगळे यांनी झाडांवर जागा मिळेल तेथे घरटी थाटली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी घरट्यात दिलेल्या अंड्यातून आता गोंडस पिल्ले जन्माला आली आहेत.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. परिणामी पाणी कमी झाल्याने तयार झालेल्या उथळ पाणथळ ठिकाणी खाद्यान्न शोधण्यासाठी चित्रबलाक पक्षी पाण्यात चोच फिरवत आहेत. खाद्य व पाणी चोचीत घेऊन ते पिल्लांना भरविण्यासाठी घरट्याकडे धाव घेतात. नर व मादी आळीपाळीने हे काम करत असतात. या दरम्यान उन्हापासून पिल्लांचे संरक्षण व्हावे यासाठी दुसरा पक्षी सूर्याकडे पाठ करून पंख पसरवून पिल्लांना पंखाची सावली देतात. खाद्यान्नाबरोबर मऊ गवताची काडी-काडी जमा करून पिल्लांसाठी गादी तयार करण्याचेही काम केले जात आहे.
पाणकावळ्यांचे पाण्यावर लॅंडीग
चित्रबलाक पक्ष्यांशिवाय येथे आलेल्या पाणकावळ्यांची पाण्यावर उतरण्याची व पाण्यावरून पळत-पळत उडण्याची कला लक्षवेधी ठरते. या पक्षांनी चित्रबलाक, राखी बगळे यांच्यासोबत शेजारी वसाहत केल्याचे पाहायला मिळत आहे. घरट्यातून थेट तलावातील पाण्यावर उतरताच पाण्यात एक खोलवर बुडी घेतात. यावेळी त्यांच्या टोकाला काहीशी वाकडी असलेली चोच माशांना भक्ष बनविते. उडता-उडता पाण्यावर उतरण्याची व पाण्यावरून पळत-पळत उड्डाण करण्याचे कमालीचे कौशल्य या पक्ष्यांकडे असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांपासून चित्रबलाक पक्ष्यांनी भादलवाडीचा ब्रिटिशकालीन तलाव विणीच्या हंगामासाठी निवडल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी पिल्लांच्या पंखात बळ आणण्याच्या दृष्टीने नर व मादी दोघेही जोमाने प्रयत्न करतात. जशी पिल्ले मोठी होतात, तसे उजनीचे व तलावाचे पाणी झपाट्याने कमी होत असते. परिणामी या पक्ष्यांना येथे मुबलक खाद्यान्न मिळते. यामुळे अल्पावधीत पक्ष्यांची पिल्ले मोठी होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला हे पक्षी येथून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात.
- रामकृष्ण येकाळे, पक्षीनिरिक्षक, स्पंदन राष्ट्रीय पर्यावरण संस्था
03490
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.