यात्रांतील ‘निकोप मनोरंजन’ हरवत चालल्याची खंत

यात्रांतील ‘निकोप मनोरंजन’ हरवत चालल्याची खंत

Published on

पळसदेव, ता. १५ : वर्षभर शेतात राबणाऱ्या बळीराजाला खरीप आणि रब्बी हंगामातील शेतातील खळी उरकल्यानंतर उन्हाळ्यात मोकळा वेळ मिळतो. याच दरम्यान भरणाऱ्या गावच्या ग्रामदैवतांच्या यात्रेत तो वर्षभराचा शिणवटा घालविण्यासाठी निखळ मनोरंजनाचा आनंद घेतो. कधीकाळी गुलाल-खोबऱ्याची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि कुस्त्यांच्या फडाने गाजणाऱ्या या यात्रा-जत्रा आजही भरतात. मात्र, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या यात्रा-जत्रांचे स्वरूप काळानुसार बदलले आहे. यात्रांतील ‘निकोप मनोरंजन’ हरवत चालल्याची खंत गावागावांतील ज्येष्ठांकडून व्यक्त होत आहे.
गावातील ग्रामदैवताची पालखी, अभिषेक आणि छबिना आजही तितक्याच श्रद्धेने पार पाडला जातो. मात्र, पालखी सोहळा संपल्यानंतर रात्री रंगणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांत मोठा बदल झाला आहे. एकेकाळी लोककला, भारुड आणि तमाशाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि निखळ मनोरंजन व्हायचे. पण आता मोबाइलच्या स्क्रीनवर विभित्स जग पाहणाऱ्या तरुण पिढीची पावले विद्रूप मनोरंजनाकडे वळू लागली आहेत.
हातात असलेल्या स्मार्टफोनमुळे जग मुठीत आले असले, तरी त्याने मानवी मूल्यांची जागा संकुचित केल्याची भावना व्यक्त होत आहे. जत्रेतील सार्वजनिक व्यासपीठांवर आता कलेपेक्षा अश्‍लील हावभाव आणि विभत्स नृत्यांना तरुणांकडून मोठी दाद मिळत आहे. सोशल मीडियावरील ‘रील्स’च्या नादात वास्तवातील संस्कृतीचा विसर पडत चालल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.
पूर्वी जत्रा म्हणजे केवळ मनोरंजन नव्हते, तर ती नातेसंबंध जपण्याची एक संधी होती. लेकी-सुना माहेरी यायच्या. एकत्रित आलेल्या पाहुण्यांची उठबस व विचारपूस व्हायची. यात्रेतील पाळणे, विक्रेत्यांची दुकाने येथे खरेदीचा आनंद लुटला जायचा. आज या यात्रा-जत्रांचे स्वरुप मोठे झाले आहे. मात्र यातील जुना जिव्हाळा हरवत चालला आहे. मनोरंजनाच्या नावाखाली चाललेला धिंगाणा गावच्या शांततेला आणि संस्कृतीला गालबोट लावत आहे. मनोरंजन जर मर्यादा ओलांडत असेल, तर त्याचा परिणाम येणाऱ्या पिढीवर नक्कीच घातक ठरेल. पुन्हा एकदा त्या जुन्या, पवित्र आणि निखळ आनंद देणाऱ्या जत्रांचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी आता गावातील सुजाण तरुणांवरच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com