

पळसदेव, ता. २६ : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पळसदेव (ता. इंदापूर) येथे पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोट्यवधी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाचे पथक गुरुवारी (ता.२६) थेट धरणाच्या पात्रात उतरल्याने परिसरातील विद्युत पंपधारक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
उजनी पात्रातील मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, त्यांचे विद्युत पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. पाटबंधारे विभागाच्या पळसदेव शाखेतंर्गत पाणी परवानगीधारक शेतकऱ्यांची सुमारे दोन कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकलेली आहे. आर्थिक वर्षाचा शेवट (मार्चअखेर) सुरू आल्याने, वरिष्ठ पातळीवरून वसुलीचे कडक आदेश दिले आहेत. वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने पाटबंधारे विभाग आता ‘ॲक्शन मोड’वर आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांना लक्ष्य करत आज पथकाने अचानक धाड टाकली.
विद्युत पंप जप्त करण्यासाठी कर्मचारी आल्याचे समजताच शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अनेकांनी आपले पंप काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर काही ठिकाणी शेतकरी आणि पाटबंधारे पथकामध्ये शाब्दिक चकमक झाली.
अडचणीतील शेतकऱ्यांची मते
- एकीकडे निसर्गाची साथ नाही
- पिकांना भाव नाही, पुरेशी वीज उपलब्ध नाही,
- कारखान्यांकडून उसाची बिले जमा झालेली नाहीत.
- पीक कर्ज भरण्यासाठी बँकांकडून तगादा
- वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची कोंडी
अनेक शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून पाणीपट्टी भरली नाही. अशात त्यांची थकबाकी लाखांचा आकडा ओलांडून गेली आहे. परिणामी शाखेच्या थकबाकीचा आकडा अडीच कोटींच्या घरात पोचल्याने, वरिष्ठांकडून वसुलीसाठी कडक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पाणीपट्टी भरणे नियमानुसार बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली जात नसल्याने ही कटू कारवाई करावी लागत आहे.
- महेश दळवी, शाखा अभियंता, उजनी पाटबंधारे विभाग, पळसदेव
१२ कोटींपैकी आतापर्यंत ३५ लाखांची वसूली
उजनी पाटबंधारे विभागाच्या पळसदेव उपविभागातंर्गत इंदापूर व दौंड तालुक्यातील सुमारे २५ गावांचा समावेश आहे. येथील हजारो शेतकऱ्यांची पाणी पट्टीची थकबाकी रक्कम १२ कोटींच्या घरात पोचली आहे. शेतकऱ्यांना वारंवार सूचना, नोटीस देऊनही त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. यामुळे आतापर्यंत केवळ ३५ लाखांची वसूली झाली आहे. एकूण थकबाकीच्या किमान ४० टक्के रक्कम (४.५ कोटी) वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने थकबाकी भरण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता नितीन खाडे यांनी केले आहे.
03530
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.