दाखले मिळेनात, प्रवेश घेता येईना
कानगाव, ता. ६ : दहावी, बारावी नंतरच्या पुढील शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रथम फेरीची कागदपत्रे अपलोड करून प्रवेश निश्चित करण्याची सोमवारी (ता. ७) शेवटची तारीख आहे. तर बारावीनंतर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी मंगळवारी (ता. ८) ही अंतिम तारीख आहे.
परंतु शनिवारी (ता. ५) रात्री १० पासून महाऑनलाईन पोर्टल देखभाल व दुरुस्तीसाठी बंद केले आहे. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. सर्व्हर बंद असल्यामुळे व दौंड तहसील कार्यालयाकडून दाखले सोडण्यास विलंब होत असल्यामुळे नागरिकांना सेतू केंद्रात, महा ई सेवा केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत. दौंड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी मागील दोन महिने नसल्यामुळे अगोदरच दाखले मिळण्यास विलंब होत होता. त्यात दोन दिवसीय सर्व्हर बंदमुळे आणखी भर पडली आहे. यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना व पालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, जात पडताळणी दाखला, डोमेसाईल, उत्पन्न दाखला, शेतकरी दाखला या प्रकारचे महत्त्वाचे दाखले आवश्यक असतात.
परंतु जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला असल्याशिवाय नॉन क्रिमीलेअर दाखला निघत नाही. जातीचा दाखला महिना महिनाभर आला नाही तर नॉन क्रिमीलेअरची पोचपावती देखील महा ई सेवा केंद्र चालकांना विद्यार्थ्यांना देता येत नाही.
प्रवेश प्रक्रियेवेळी पोचपावती जोडली असता महाविद्यालय पोचपावती न घेता मूळ दाखला घेऊन या अन्यथा तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल, असे विद्यार्थ्यांना व पालकांना सांगत असल्यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची चांगलीच धांदल उडालेली आहे. या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी उपविभागीय अधिकारी दौंड व तहसीलदार दौंड यांनी या बाबी कडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर दाखले वितरित करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.