
फुलगाव येथील चौकाचा उद्या नामकरण सोहळा
केसनंद, ता. १९ : छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फुलगावकर सज्ज झाले असून, येत्या मंगळवारी (ता. २१) सकाळी १०.३० वाजता फुलगाव (ता. हवेली) येथील रायसोनी इंडस्ट्रिअल पार्क येथे पालखी सोहळ्याचे स्वागत व छत्रपती शंभुराजे पालखी चौक नामकरण फलकाचे अनावरण विविध मान्यवर व शंभूभक्तांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक प्रवीण रायसोनी यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला माहीत व्हावा, या उद्देशातून ७ वर्षापूर्वी संस्थापक संदीप भोंडवे यांनी या पालखी सोहळ्यास सुरवात केली. दरवर्षी या पालखी सोहळ्याच्या विसाव्याच्या निमित्ताने फुलगाव येथील रायसोनी इंडस्ट्रिअल पार्क चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत व अभिवादनाची सुरवात कै. बन्सीलाल बी. रायसोनी यांनी केली. दरवर्षी अल्पोपाहार व चहापान करून स्वागताचा हा उपक्रम रायसोनी परिवार व फुलगाव ग्रामस्थांच्या वतीने आजवर सुरु ठेवला आहे.
फुलगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये शंभुराजांची सेवा कायमच होत राहावी, या उद्देशाने फुलगाव येथील रायसोनी इंडस्ट्रिअल पार्क चौकास छत्रपती संभाजी महाराज पालखी चौक, अशा नामकरणाची संकल्पना प्रवीण रायसोनी यांनी फुलगाव ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यास सर्वांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे भोंडवे यांच्या हस्ते या पालखी चौकाचे नामकरण व पालखीचे स्वागत येत्या मंगळवारी विविध मान्यवर व शंभूभक्तांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.