अपघातप्रवण स्थळी तातडीने उपाययोजना करा

अपघातप्रवण स्थळी तातडीने उपाययोजना करा
Published on

कोरेगाव भीमा, ता. ७ : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील धोकादायक अशा अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्या आहेत.
या घटनेचे वृत्त समजताच शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी माहिती पाठवण्याच्या सूचना दिल्या.
पिंपळे जगताप येथील अपघातासारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील गंभीर अपघाताचा धोका कमी करण्यासाठी चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत एमएसआयडीसीसह शासनाच्या संबंधित खात्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून दुभाजकासह रस्तारुंदीकरण करण्याच्या कामाबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार माऊली कटके म्हणाले.

शिरूर तालुक्यातील रस्त्यांवर गेल्या वर्षभरात झालेल्या गंभीर अपघातात १६२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताचे हे प्रमाण चिंताजनक असून, याबाबत प्रबोधन तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तसेच त्यासाठी नागरिकांनीही हेल्मेटसह वाहतूक सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.
-प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर

तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याचे काम आता केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. यात तळेगाव ते चाकण उड्डाण पूल, तर चाकण ते शिक्रापूर दुभाजकासह चौपदरी महामार्ग, असे नियोजन आहे. संबंधित कामाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येईल.
-रणजित हांडे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com