तुळापूरात वृक्षप्रेमींकडून पर्यावरण संवर्धनाचा वसा
केसनंद, ता. २९ : श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथील २०० एकरातील गायरान क्षेत्रामधील इंद्रायणी वनराई प्रकल्पात दीड लाख रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान भूमीत गट नं. ६४ मध्ये पर्यावरणप्रेमी ग्रामस्थ, ग्रामपंचायत व सेवाभावी संस्थांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतला आहे.
संभाजी महाराज यांच्या समाधिस्थळी नतमस्तक होण्यासाठी येणारे शंभुभक्त व पर्यावरणप्रेमी वनराई प्रकल्पालाही भेट देत आहेत. या प्रकल्पात जांभूळ, चिंच, आंबा, फणस, अंजीर, कडुनिंब अशा विविध फळझाडांसह, वड, पिंपळासारखी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देणारी १५ प्रकारची विविध रोपे लावण्यात आली आहेत. या इंद्रायणी वनराई प्रकल्पात झाडांना पाणी देण्यासाठी पाच कूपनलिका, तसेच पाणी साठवणीसाठी पन्नास लाख लिटरचा शेत तलावही बनवण्यात आला आहे. तर सलग वीजपुरवठ्यासाठी दोन सौर प्रकल्पही बसवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था असून प्रत्येक झाडाला पाणी मिळते की नाही, हे पाहण्यासाठी विशेष स्वयंचलित यंत्रणाही बसविण्यात आल्याने या यंत्रणेद्वारे सिंचन व्यवस्थेचे मॉनिटरिंग करण्यात येते.
दरम्यान, या वनराई प्रकल्पात आणखी दहा हजार झाडे लवकरच लावण्यात येणार आहेत. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या चार वर्षाच्या कालावधीनंतर कल्पतरू संस्था हा प्रकल्प श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करणार आहे. त्या दृष्टीने या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभेद्वारे वनसमितीही स्थापन केली असून या समितीमध्ये सरपंच ॲड.गुंफा इंगळे, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पवन खैरे, राजाराम शिवाजी शिवले, राजू नाना शिवले, नवनाथ रघुनाथ शिवले, संतोष शिवले, विनोद राऊत आदींसह १३ सदस्य असून किसन गोविंद पुजारी हे अध्यक्ष म्हणून या समितीचे काम पाहात आहेत.
प्रकल्पाला वीजजोडाचीची गरज
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षोरापण हा शासनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम असताना अशा या प्रकल्पाला सिंचनासाठी तातडीने वीज जोडाची गरज आहे. मात्र, यासाठी वनसमितीने पाठपुरावा करूनही अद्याप या प्रकल्पाला जोड मिळालेला नाही. याबाबत आता वनसमिती जिल्हाधिकाऱ्यांनाच साकडे घालणार आहे.
04993
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.