वाडेगाव येथे एकावर गोळीबार
केसनंद, ता.१ : जमिनीचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एकावर वाडेगाव (ता. हवेली) येथे पिस्तूलातून गोळीबार झाल्याची घटना वाडेबोल्हाई रस्त्यावरील साई नर्सरीजवळ घडली. लोणीकंद पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्याील एकाचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी सुशिल संभाजी ढोरे (वय ४२, रा. ढोरेवस्ती, केसनंद ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव तसेच भिवराज सुरेश हरगुडे (सर्व रा.केसनंद ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन व भिवराज यांना अटकही केली असून गणेश याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद येथील दत्ता ढोरे व सचिन ढोरे यांचेमधील जमिनीना वाद असून चुलतभाऊ सुशिल ढोरे हे दत्ता ढोरे व सचिन ढोरे यांच्यामध्ये असलेला जमिनीचा वाद मिटवण्यासाठी ३१ जुलैला रात्री ९.३० वाजताचे सुमारास वाडेबोल्हाई रस्त्यावर वाडेगाव (ता. हवेली) येथे साई नर्सरीजवळ गेले होते. मात्र, त्याचा राग सचिन ढोरे यास आल्याने सचिन ढोरे याने त्याच्याकडील अनधिकृत पिस्तुलाने सुशील यांच्यावर गोळीबार केला. या वेळी त्यांच्या छातीमध्ये उजवे बाजूस गोळी लागल्याने सुशिल ढोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.