पक्षाऐवजी स्थानिक विकास आघाडीची चाचपणी
पक्षाऐवजी स्थानिक विकास आघाडीची चाचपणी
हवेली पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने थेऊर, केसनंद, कोरेगाव मूळ व खानापूर गणात अधिक चुरस पाहायला मिळू शकते. त्यात बदललेली प्रारूप रचना व गट, गणांच्या आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का व नव्यांना संधी मिळणार आहे. विधानसभेप्रमाणे महायुती व आघाडी न झाल्यास प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच लढतीचे चित्र आहे. दरम्यान पक्षाऐवजी स्थानिक विकास आघाडी करता येईल का, याचीही चाचपणी स्थानिक नेत्यांकडून सुरु असल्याची चर्चा आहे.
- शरद पाबळे, केसनंद
हवेली पंचायत समितीवर सन २०१७च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ शिवसेना व भाजपचे बलाबल होते. त्यानुसार सुरुवातीला सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली महाडीक, हेमलता काळोखे, दिनकर हरपळे, संजीवनी कापरे व भाजपच्या फुलाबाई कदम, अनिल टिळेकर व शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख, नारायण आव्हाळे यांनाही नेतृत्वाची संधी मिळाली. मात्र, हवेलीतील गावांचा टप्प्याटप्प्याने महापालिकेत समावेश झाला. तसेच, पंचायत समितीची गणसंख्याही कमी होऊन काही काळ सभापतिपदही रिक्त राहिले.
सध्या पूर्व हवेलीत पेरणे- लोणीकंद, कोरेगाव मूळ- केसनंद, उरुळी कांचन- सोरतापवाडी, थेऊर- आव्हाळवाडी, लोणी काळभोर-कदमवाकवस्ती, खेड शिवापूर- खानापूर हे एकूण १२ पंचायत समिती गण अस्तित्वात आले आहेत. यात लोणीकंद, पेरणे व आव्हाळवाडी गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने येथील पुरुष इच्छुक थंडावले आहेत. तर, कदमवाकवस्ती (अनुसूचित जाती), उरुळी कांचन (अनुसूचित जाती महिला), सोरतापवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), लोणी काळभोर (मागास प्रवर्ग महिला), खेड शिवापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) या गटातही अपेक्षेप्रमाणे आरक्षण न आल्याने बऱ्याच कालावधीपासून तयारी करत असलेल्या प्रस्थापित इच्छुकांच्या गोटात शांतता आहे.
राष्ट्रवादी व शिवसेनेतील फुटीनंतर पूर्व हवेलीत सध्या प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजकीय वातावरण असले, तरीही शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणाराही मतदार वर्ग आहे. परंतु, सध्या राज्यात सत्तेत असलेली महायुती, तसेच विरोधातील महाविकास आघाडीतील पक्ष सध्याच्या निवडणुकीत महायुती किंवा आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर लढणार, याबाबत कोणतेच ठोस संकेत अद्याप कोणत्याही पक्षाने दिलेले नाहीत. मात्र, विधानसभेप्रमाणेच युती- आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला समोरासमोर लढावे लागणार असल्याने स्वबळावर तयारीच्या सूचनाही पक्षनेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसेच, प्रसंगी पक्षाऐवजी स्थानिक विकास आघाडी करता येईल का, याचीही चाचपणी स्थानिक नेत्यांकडून सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार माउली कटके, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, तसेच यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप आदींसह तालुक्यातील प्रमुख पक्षांचे नेते या निवडणुकीबाबत आपापल्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून काय भूमिका घेतात, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
मागील बलाबल
हवेली पंचायत समितीच्या २०१७ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस १४ जागा, शिवसेना ७ जागा, तर भाजप ६ जागा, तर आघाडी १ एक जागा, असे पक्षीय बलाबल होते.
स्थानिक प्रश्न
सध्या हवेलीत वाहतूक कोंडीची समस्या, उड्डाणपूल व विस्तारित मेट्रोचे प्रलंबित काम, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, रिंग रोडसारख्या प्रकल्पांसाठी भूसंपादन, अतिक्रमण कारवाई, गुंठेवारीचे प्रश्न, वाढती गुन्हेगारी हे प्रमुख प्रश्न आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

