हवेलीत राष्ट्रवादी विरोधात भाजपने थोपटले दंड

हवेलीत राष्ट्रवादी विरोधात भाजपने थोपटले दंड

Published on

केसनंद, ता. २२ : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पूर्व हवेलीत महापालिकेप्रमाणेच प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच लढतीचे चित्र असून, काही ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना, अशी तिरंगी लढत होत आहेत. प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपने दंड थोपटले आहेत. एबी फॉर्म अनेकांना दिल्याने नेमके अधिकृत उमेदवार कोण हेही अद्याप ठरत नाही. ऐनवेळी उमेदवारी नाकारलेले नाराज उमेदवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
हवेलीत जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी एकूण ४४ जणांनी, तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन तासात उमेदवारी न मिळू शकलेल्या काहींनी तातडीने निर्णय घेत गळ्यातील पट्टी बदलत दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेतली. आज झालेल्या छाननीत प्रमुख पक्षांचे अर्ज वैध ठरल्याचे समजते.
पेरणे- लोणीकंद या सर्वसाधारण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना, अशी तिरंगी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून आलेले प्रदिप वसंतराव कंद यांना उमेदवारी दिली आहे.त्यांच्या विरोधात भाजपने किरण संपत साकोरे यांना मैदानात उतरवले आहे. योगेश बाजीराव झुरुंगे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. पेरणे पंचायत समिती गणात राष्ट्रवादीने संगीता जालिंदर वाळके यांना, तर लोणीकंद गणात लोचन विजय शिवले यांना उमेदवारी दिली आहे.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या केसनंद- कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटात भाजपच्या कविता विजय पायगुडे व राष्ट्रवादीच्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्यात लढतीचे चित्र आहे. केसनंद गणात राष्ट्रवादीने प्रमोद चंद्रकांत हरगुडे, तर कोरेगाव मूळ गणात मनोज दत्तात्रेय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित उरुळी कांचन- सोरतापवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने शंकर बडेकर यांना रिंगणात उतरविले आहे. उरुळी कांचन गणात राष्ट्रवादीने कोमल गणेश कांबळे तर सोरतापवाडी गणात अण्णा भाऊसाहेब महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. उरुळी कांचन- सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही उमेदवार रिंगणात आहेत.
ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित थेऊर- आव्हाळवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोमल संदेश आव्हाळे व भाजपच्या पुष्पलता प्रकाश सावंत यांच्यात लढत रंगणार आहे. थेऊर- कुंजीरवाडी- आळंदी गणात राष्ट्रवादीकडून युवराज हिरामण काकडे व सिद्धांत सचिन तुपे यांच्यात वाटाघाटी सुरू असून, थेऊर कोलवडी गणात सुषमा संतोष मुरकुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित लोणीकाळभोर- कदमवाकवस्ती गटात तिरंगी लढत होत असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल सुजित कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात भाजपने पुनम बाबुराव गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाकडूनही जिल्हा परिषद गटासाठी सिंपल गणेश कांबळे यांना उमेदवारी दिली आहे.
कदमवाकवस्ती गणासाठी राष्ट्रवादीकडून अमोल टेकाळे, तसेच लोणी काळभोर-वडकी गणासाठी रेशमा युवराज काळभोर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे कदम वाकवस्ती गणात शिवसेनेकडून विजय दाभाडे, तर लोणी काळभोर पंचायत समिती गणातून नंदिनी कोळपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खेड शिवापूर खानापूर जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीकडून पूजा नवनाथ पारगे तर खेड शिवापुर पंचायत समिती गणासाठी अश्विनी राजेश डिंबळे यांना, तसेच खानापूर गणात युवराज नारायण वांजळे यांना उमेदवारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com