हवेलीत ६ गटातून २५ उमेदवार रिंगणात
केसनंद, ता. २७ : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी प्रमुख पक्षांचे उमेदवार वगळता शेवटच्या दोन-तीन तासात अनेकांनी माघार घेतली. त्यामुळे आज अखेर हवेली तालुक्यात ६ जिल्हा परिषद गटातून २५ उमेदवार तर १२ पंचायत समिती गणातून ४२ उमेदवार रिंगणात आहेत.यात पूर्व हवेलीत महापालिकेप्रमाणेच प्रामुख्याने राष्ट्रवादी व भाजपमध्येच प्रमुख लढतीचे चित्र असून काही ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व शिवसेना (उबाठा) तसेच वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार रिंगणात आहेत.
पूर्व हवेलीत आपले राजकीय वर्चस्व राखण्यासाठी प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपने दंड थोपटले आहेत. हवेलीत जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी २५ जणांनी, तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ४२ जणांनी आज आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या काही तासात अनेक अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
जिल्हा परिषद गटनिहाय लढतीचे चित्र पाहिल्यास, हवेलीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पेरणे- लोणीकंद या सर्वसाधारण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना अशीच तिरंगी लढत होत आहे. माघारीनंतर येथे काय चित्र असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आज माघारीनंतर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदिप कंद तसेच भाजपचे किरण साकोरे तर शिवसेनेचे उमेदवार योगेश झुरुंगे यांच्यातच तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची लढत असलेल्या या लढतीत कोण विजयी होणार? याबाबत सर्वांनाच उत्कंठा असणार आहे. तर पेरणे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी भाजप तसेच शिवसेनेने ही आपले उमेदवार दिल्याने येथे चुरस वाढली आहे.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात भाजपच्या कविता पायगुडे व राष्ट्रवादीच्या सुरेखा हरगुडे यांच्यात प्रमुख लढती होत आहे. तर केसनंद गणात व कोरेगाव मूळ गणातही राष्ट्रवादी तसेच भाजप
मध्येच प्रमुख लढतीचे चित्र आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित उरुळी कांचन- सोरतापवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र बडेकर, भाजपचे शंकर बडेकर तसेच शिवसेना उबाठाचे अनिल कदम तसेच वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब बडेकर व अपक्ष सदाशिव कांबळे
हे उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित थेऊर-आव्हाळवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोमल आव्हाळे व भाजपच्या पुष्पलता सावंत यांच्यात लढत रंगणार आहे. तर थेऊर-कुंजीरवाडी-आळंदी तसेच कोलवडी गणातही राष्ट्रवादी तसेच भाजपमधे चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित लोणीकाळभोर-कदमवाकवस्ती गटातही तिरंगी लढत होत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल कांबळे, भाजपच्या पुनम गायकवाड तर शिवसेना शिंदे गटाच्या सिंपल कांबळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तसेच या तीनही पक्षांचे लोणी काळभोर तसेच कदमवाकवस्ती गणातही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तसेच खेड शिवापूर- खानापूर जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीकडून पूजा पारगे तर भाजपच्या सारिका पायगुडे, शिवसेना (ठाकरे) प्रियांका सुर्वे तसेच शिवसेना (शिंदे) पक्षाच्या रुपाली कोंडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या निशा सोनवणे यांच्यात लढत होत आहे. तर खेड शिवापूर व खानापूर गणातही या प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने येथे चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

