

केसनंद, ता. २५ : पूर्व हवेलीतील डोंगरगाव व पेरणे गावाला जोडणारा शिवरस्ता २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर खुला झाला आहे. अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी संबंधितांशी चर्चेतून काढलेल्या तोडग्यामुळे प्रशासनाला हे यश आले असून, यामुळे शेतकरी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियाना’अंतर्गत १० एप्रिल रोजी लोणीकंद येथे ‘समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोंगरगाव (ता. हवेली) येथील लक्ष्मण हरी गायकवाड यांनी गट नंबर ६३ मध्ये जाण्यासाठी रस्त्याची मागणी केली होती. सन २०२१मध्ये तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. मात्र, स्थानिक वादांमुळे तीन वेळा कारवाई होऊनही यश आले नव्हते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दोनवेळा प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. मोजणी विभागाने हद्दी निश्चित केल्यावर रस्त्यात विजेचा खांब व एका घराचा काही भाग येत असल्याचे समोर आले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूंनी तडजोडीची भूमिका घेतल्याने हा रस्ता मोकळा झाला. पेरणे ग्रामपंचायत, महावितरण आणि मोजणी विभागाच्या संयुक्त सहकार्याबद्दल महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे. दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या ग्रामपंचायतीकडे मांडाव्यात, जेणेकरून १० एप्रिलच्या शिबिरात त्यावर निर्णय घेता येईल, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
05500
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.