फाटलेल्या आभाळाला सासू-सुनेच्या मायेची ठिगळं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फाटलेल्या आभाळाला सासू-सुनेच्या मायेची ठिगळं
फाटलेल्या आभाळाला सासू-सुनेच्या मायेची ठिगळं

फाटलेल्या आभाळाला सासू-सुनेच्या मायेची ठिगळं

sakal_logo
By

केडगाव, ता. ८ ः
मोडून पडला संसार,
तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा...
दापोडीतील (ता. दौंड) वाघमोडे कुटुंबाचा संघर्ष जाणून घेतल्यानंतर कविवर्य कुसुमाग्रजांच्या वरील कवितेची आठवण अन् नारीशक्तीची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. नवरा गेला, घरातील दोन कर्ती मुले आकस्मिक गेल्यावर आभाळ तर फाटणारच ना. कुठं कुठं ठिगळ देणार. सामान्य स्त्री ‘आता सर्व संपलं’ असं म्हणून हात पाय गाळून घरात बसली असती. मात्र, दापोडीतील जिद्दी अनुसया बापूराव वाघमोडे यांनी स्वतः पदर खोचत सून वंदना भाऊसाहेब वाघमोडे हिचे अश्रू पुसले. अन् पाठीवर हात ठेवून लढ म्हणाली. वंदना यांनी वज्रमूठ आवळत सासूचा विश्वास सार्थ करून दाखवला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना आदर्श मानत वंदना परिस्थितीशी लढा देत आहेत. संघर्ष सांगताना दोघींना भावना अनावर झाल्या.
दापोडीत बापूराव वाघमोडे आणि त्यांची भाऊसाहेब व शिवाजी अशी दोन विवाहीत मुले राहत होती. अचानक अघटित घडले. २०१० मध्ये शिवाजीचे (वय २७) ह्रदय विकाराने निधन झाले. २०१५मध्ये बापूराव (वय ५७ ) आकस्मिक गेले. तर २०२१ मध्ये भाऊसाहेब (वय ४०) यांनी मुलीच्या लग्नाच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. एकाच कुटुंबातील तीन कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने महिलांच्या पायाखालची जमीन सरकली. शिवाजी वाघमोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माहेरी राहतात. तर वंदना यांनी पतीच्या निधनानंतर ११व्या दिवशी शेतात पाऊल टाकले. दहा एकर शेती आज हिरवीगार आहे. घरापासून शेती तीन किलोमीटर असल्याने वंदना स्कूटर चालवायला शिकल्या. आज त्यांच्याकडे ट्रॅक्टर, ट्रेलर, लिफ्ट, नांगरसह शेतीची सर्व साधने आहेत.
वंदना या सरी तोडणे, वाफे ओढणे, पिकांना पाणी देणे, गहू, कांदा बी, धने टाकणे, धारा काढणे, तरकारी विक्री, दुचाकीवरून चारा आणणे आदी कामे करतात. आम आदमीचे तालुका प्रमुख रवींद्र जाधव यांनी वंदना व अनुसया यांना नवरात्रात कर्तृत्ववान महिला म्हणून गौरविले. सासू-सुना मायलेकीसारख्या राहतात. गावकऱ्यांना त्यांचा हेवा वाटतो. अनुसया यांना दोन वेळा ह्रदय विकाराचा झटका येऊन गेला आहे. सुनेने सासूसाठी सात लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च केला. सासूसुनांच्या संघर्षमय जीवनाकडे पाहताना ‘दुनिया मे कितना गम है, मै अपना गम भुल गया’ या गीताच्या ओळी सहज ओठावर येतात.


‘‘मुलांकडे पाहत दुःखाला कवटाळून बसले नाही. सासूच्या शब्दांच्या आधाराने मला उभारी मिळाली. परिस्थितीने मला अनेक गोष्टी शिकवल्या. सासूच्या मार्गदर्शनामुळे कुटुंब सावरत आहे.’’
- वंदना वाघमोडे

02380
02378
02377