पाटसकरांच्या घरासाठी ‘महसूल’ची सूत्रे हलली
केडगाव, ता. १८ : दौंडचे माजी आमदार व स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ पाटसकर यांना घरासाठी द्यावयाच्या जागेचा अहवाल दौंड तहसील कार्यालयाने शुक्रवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्याचे तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले.
जगन्नाथ पाटसकर यांच्या घराचा प्रश्न गेली ३१ वर्ष रेंगाळला आहे. हा प्रश्न अनेकांच्या विस्मृतीत गेला होता. जून २०२१ मध्ये ‘सकाळ’ने हा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आणला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घातले. ‘सकाळने’ हा प्रश्न विस्ताराने व सातत्याने मांडला. घरासाठी जागा मिळवताना महसूल व नगरविकास विभागाच्या विविध तांत्रिक बाबी पार पाडाव्या लागणार होत्या. या कामात काही अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. तरीही हे काम दोन वर्ष रेंगाळल्याने १५ ऑगस्ट रोजी ‘सकाळ’ने ‘एकनाथ देईल का जगन्नाथला न्याय’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे महसूल विभागातील सूत्रे हलली.
दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी या कामात लक्ष घालून मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे व मंडल अधिकारी गिरीश भालेराव यांना हे काम आजच पूर्ण करण्याच्या सूचना सकाळीच दिल्या. भोंडवे आणि पाटसकर यांचे नातू सागर पाटसकर यांनी दिवसभर कागदपत्रांची जुळवाजुळव केली. सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अभिप्रायासह कागदपत्रे पाठविण्यात आली. मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रताप माडकर यांनी ११ मे २०२२ रोजी मागितलेल्या सर्व सात खुलाशांची पूर्तता आज केली. त्यामुळे पाटसकर कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. अभिप्राय सकारात्मक असल्याचे अर्जदार सागर पाटसकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

