पारंपरिक वाद्यांच्या दुरुस्तीची चौफुल्यात लगबग
केडगाव, ता. ९ : आषाढ वारीचा सोहळा अवघ्या दहा दिवसांवर आला असताना चौफुला (ता. दौंड) येथील ज्ञानसागर दुकानात मृदंग, वीणा, हार्मोनिअम, तबला दुरुस्तीची लगबग सुरु आहे. वाडेकर कुटुंबीयांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. पाचव्या पिढीतील बापू प्रल्हाद वाडेकर हे वयाच्या नवव्या वर्षापासून हे काम करत आहेत.
कांबळेश्वर (ता. बारामती) येथील वाडेकर ११ वर्षांपासून चौफुल्यात स्थायिक झाले आहेत. मृदंग, वीणा, हार्मोनिअम, तबला, एकतारी, ढोल, हलगी, खंजिरी, ढोलकी, तुणतुणे, डमरू, चिपळी, पियानो, ऑर्गन, ताशा, कच्ची अशा सर्व प्रकारच्या वाद्यांच्या दुरुस्ती आणि विक्रीचे काम त्यांच्या दुकानात चालते. विशेष म्हणजे ही सर्व प्रकारची वाद्ये बापू वाडेकर उत्तम प्रकारे वाजवतात.
वाद्यांच्या दुरुस्तीची कामे ही ग्रामीण भागात सहसा होत नाहीत. वाडेकर यांचे दौंड तालुक्यातील एकमेव दुकान आहे. त्यांच्या दुकानात सिद्धटेक, न्हावरा, काष्टी, तांदळी, भिगवण, सुपे, मोरगाव, मुर्टी, माळशिरस, सादलगाव, उरळी कांचन, कुरकुंभ येथून ग्राहक येत असतात. त्यांच्या दुकानात पखवाजाला शाई भरणे, पान बदलणे, शाई पुडी, धुम पान, गजरा, वादी लावणे, हार्मोनिअमची हवा फिटिंग, सूर लावणे, भाते दुरुस्ती, वीण्याच्या तारा बदलणे आदी कामे केली जातात.
वाद्यांसाठी लागणारे चमडे सोलापूर येथून तर शाई भावनगर (गुजरात) मधून आणली जाते. वाडेकर यांच्या दुकानात सर्व प्रकारची वाद्ये विकत मिळतात. यात ढोल, ताशा, मृदंग यास मागणी आहे. या दुकानात वाद्य एक्स्चेंज करून मिळतात. विक्री दुरुस्तीचा श्रावण, आषाढ, कार्तिक महिन्यात हंगाम असतो. अशिक्षित असलेले वाडेकर हे बिगर हंगामात दुकान पाहून जागरण गोंधळ, भजन, तमाशाच्या फडात वाद्यांचे काम करतात. जास्तीचे काम असेल तर वाडेकर हे घरपोच सेवा देतात. वाडेकर यांच्या पत्नी नंदा या सुद्धा त्यांना दुरुस्तीच्या कामात मदत करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.