jagannath pataskar
jagannath pataskarsakal

Jagannath Pataskar : ब्रिटिशांच्या विरोधात जिंकले, स्ककियांकडून हरले

स्वातंत्र्यसंग्रामात चार वेळा तुरुंगवास भोगलेले, त्यानतंर सन १९६७ मध्ये आमदार झालेल्या पाटसकर यांची तिसरी पिढी आजही दौंड शहरात भाड्याच्या घरात राहत आहे.
Published on

केडगाव - ब्रिटिशांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता, त्या परकीय सत्तेविरूद्ध पुकारलेला लढा स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ पाटसकर यांनी जरूर जिंकला, मात्र स्वकियांकडूनच ते पुरते पराभूत झाल्याचे चित्र ३५ वर्षानंतरही कायम आहे. स्वातंत्र्यसंग्रामात चार वेळा तुरुंगवास भोगलेले, त्यानतंर सन १९६७ मध्ये आमदार झालेल्या पाटसकर यांची तिसरी पिढी आजही दौंड शहरात भाड्याच्या घरात राहत आहे.

पाटसकर यांचा जन्म १ जानेवारी १९१७ मध्ये भाळवणी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे झाला. त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झालेले. त्यांचे वडील तात्याबा हे रेल्वेत नोकरीला होते. निवृत्त झाल्यानंतर ते सन १९३० मध्ये दौंड येथे स्थायिक झाले. जगन्नाथ यांना शालेय जीवनापासून स्वातंत्र्य चळवळीचे वेड लागले होते. सन १९३२, १९३६, १९४०, १९४२ मध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आंदोलन केले म्हणून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

ब्रिटिशांनी त्यांना स्थानबद्ध केले होते. घरची गरीबी होती. घरातील प्रत्येक माणूस मिळेल ते काम करीत असे. जगन्नाथ यांनी दौंडमध्ये हॅाटेलमध्ये काम केले. त्यांच्याकडे ‘दैनिक सकाळ’ची एजन्सी होती. त्यावरच त्यांचा घर प्रपंच चालत होता.

महात्मा गांधीच्या आदेशानुसार वैयक्तिक सत्याग्रहात व मिठाच्या सत्याग्राहत त्यांनी भाग घेतला. त्यांच्या घोषणाबाजीला दौंडमधून चांगला प्रतिसाद मिळू लागला. तालुका पेटून उठला. दौंड तालुक्यातील २२ तरूणांनी त्यांच्याबरोबर सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली. तुरुंगातून घरी आल्यानंतर लोकांनी मिरवणूक काढली. दारूबंदी चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. परदेशी कापडांची होळी करताना गोळीबार झाला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले.

तुरुंगातून आल्यावर घरच्या लोकांना म्हणाले, ‘मी सत्याग्रहात भाग घेतला, तुरुंगात गेलो, तुम्हा सर्वांचे पोटापाण्याचे खूप हाल झाले, याची जाणीव आहे मला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याचे दिवस जवळ आले. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपणा सर्वांना हाल काढावे लागतील, धीर धरा.’
स्वातंत्र्यलढ्यात ते यशवंतराव चव्हाणांच्या सानिध्यात आले. पाटसकरांमध्ये हेरलेले गुण यशवंतराव विसरले नव्हते. सन १९६७ च्या निवडणुकीसाठी त्यांनी पाटसकरांना दौंड तालुक्यात काँग्रेसची उमेदवारी दिली आणि पाटसकर आमदार झाले! पण ना त्यांची वृत्ती बदलली ना स्वभाव.

झोळी लटकवूनच ते तालुकाभर फिरायचे व लोकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचे. पण स्वतःच्या बाबतीत मात्र आडवाटेने नव्हे तर रीतसर होऊ शकणारी कामंही त्यांनी मागेच ठेवली. घरादाराच्या भवितव्याची बेगमी करून ठेवण्याची ती एरवी मोठी संधी होती. त्यांनी ना पेट्रोल पंप घेऊन ठेवला, ना दारूचे लायसन्स! मोठी इस्टेट नाही तरी, स्वतःच्या कुटुंबासाठी एखादं छोटेखानी घर तरी बांधून घेणं, त्यांना सहज जमण्याजोग होतं.

सन १९९०च्या सुमारास दौंड तालुक्यातील एस.टी. स्थानक, आगार व ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले होते. पण त्यासाठी जमीन मिळत नसल्याने या योजना प्रत्यक्षात येत नव्हत्या. केवळ जमीन मिळत नाही म्हणून जनतेने प्रश्न आडून राहिले, याची खंत त्यांना वाटली. सरकारकडून त्यांना मिळालेली जमीन त्यांनी पुन्हा सरकारला या दोन कामांसाठी देऊन टाकली. या बदल्यात त्यांना दौंड शहरात घर बांधून द्यायचे होते. सन १९९२ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या घराचे भूमिपूजनसुद्धा झाले. पण, लालफितीमुळे त्यांचे घर अद्याप अस्तित्वात आले नाही. ही शोकांतिका आहे.

‘एसटी’कडूनही अवहेलना
पाटसकर यांच्याबाबत एसटी महामंडळाने कधीच कृतज्ञता दाखवली नाही. स्थानकाची इमारत पूर्ण झाल्यावर पाटसकर यांना वृत्तपत्र विक्रीसाठी तेथे गाळा हवा होता. पाटसकर यांनी तशी मागणी केली. मात्र, पाटसकर कुटुंबीयांना गाळ्यासाठी ‘डिपॉझिट’ भरून लिलावात भाग घेण्याचे सुचविण्यात आले. अधिकाऱ्यांनी थेट गाळा देण्याची ‘प्रोसिजर’ नसल्याचे सांगितले. पाटसकर कुटुंबीयांसाठी आजही रेशनिंग दुकान व संक्रांत, नवरात्र, दिवाळीमध्ये मडके, पणत्या विकणे हे उदरनिर्वाहाचे साधन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com