दौंडमध्ये पुन्हा कुल- थोरात गटात संघर्ष
केडगाव, ता. १४ : दौंड तालुक्याचे राजकारण ज्या कुल- थोरात यांच्याभोवती फिरत असते, त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने निवडणुकीची चुरस वाढणार आहे. आरक्षण सोडतीमुळे तालुक्यात कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी तालुका पातळीवरील या दोघांमधील टोकाचा संघर्ष पुन्हा एकदा मतदारांना या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळेल, अशी चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सर्वसाधारण असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष राहणार आहे. रमेश थोरात यांचा मुलगा तुषार थोरात यांच्या सुदैवाने त्यांचा बोरीपार्धी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण निघाला आहे. तुषार थोरात यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण, ही निवडणूक उमेदवारांची नसून ती कुल- थोरात यांची असल्याने येथे कॉंटे की टक्कर पाहायला मिळेल.
राहू जिल्हा परिषद गट सर्वसाधारण असल्याने येथे भाजप व राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. आमदार राहुल कुल यांच्या राहू जिल्हा परिषद गटामध्ये कोणाला उमेदवारी देतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. यवत जिल्हा परिषद गट हा यंदा नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे येथील सर्वसाधारण गटातील कार्यकर्त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. या गटातून कोणत्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची याबाबत राष्ट्रवादी व भाजपमध्ये तगडा उमेदवार सध्या तरी दिसत नाही .त्यामुळे या गटातून दोन्ही पक्षाकडून नवखे चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे.
खडकी गटाचे आरक्षण हे सर्वसाधारण आल्याने या गटातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. भाजपकडून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून येथे इच्छुक आहेत.
वरवंड आणि पाटस हे दोन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. आरक्षण निघण्यापूर्वी या गटांमध्ये सर्वसाधारण निवडणुकीची तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सौभाग्यवती निवडणूक रिंगणात उतरतील. अशी चिन्हे आहेत.
वरवंड गटामध्ये पारगावचा समावेश आहे. या दोन्ही गावात इच्छुकांची संख्या मोठी आहे.
गोपाळवाडी गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे या गटातून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नीता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) यांचे नावे चर्चेत आहेत.