न मागता देणारा आमदार

न मागता देणारा आमदार

Published on

न मागता देणारा आमदार

खरा विकास तोच, जिथे लोकांना आपले हक्क मागावे लागत नाहीत, आणि शासनाला आपले कर्तव्य आठवावे लागत नाही. लोकहितार्थ कार्य म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होय. आमदार राहुल कुल यांनीसुद्धा दौंड तालुक्यासाठी असे काही प्रकल्प आणले आहेत, की जे लोकांनी कधी मागितले नव्हते. काही हजार कोटीतील प्रकल्प आहेत त्याला वेळ तर लागणारच ना, पण विकासाची दिशा प्रगतीकडे नेणारी आहे. राहुलदादा यांच्या आज वाढदिवस त्यानिमित्त अशाच मोजक्या प्रकल्पांवर टाकलेला दृष्टीक्षेप...


समाजाच्या विकासाचा खरा अर्थ फक्त इमारती, रस्ते किंवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीत नसतो, तर तो लोकांच्या जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलांमध्ये असतो. कोणत्याही समाजात प्रगती घडते, ती तेव्हा, जेव्हा लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पाणी, रस्ता, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासाठी मागणी करावी लागत नाही, तर त्या सुविधा त्यांच्यापर्यंत आपोआप पोहोचतात.

बेबी कालवा
ब्रिटिश काळात बेबी कालवा दौंड तालुक्यात पाटसपर्यंत झाला होता. या कालव्यानंतर सध्या कार्यान्वित असलेला नवीन मुठा कालवा झाला. नवीन मुठा कालवा झाल्यानंतर या कालव्याकडे दुर्लक्ष होत गेले. अन् कालांतराने सुमारे ५० वर्षापूर्वी हा बेबी कालवा बंद पडला. काही ठिकाणी अशी अवस्था होती की शेतकऱ्यांनी कालवा सपाट करून तेथे जमीन तयार केली होती. अलीकडच्या काळात पुणे शहरातील पाण्याची मागणी वाढत गेली. ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची मागणी वाढत चालली होती. याचा ताण साहजिकच शेती सिंचनावर आला. धरणातील पाण्याची साठवण क्षमता तर वाढवता येत नव्हती. पुणे शहराने त्यांचा पाणी कोठा वाढवून घेतला. त्यावेळी शहराने वापरलेले सहा टीएमसी पाणी शुद्ध करून ते दौंड तालुक्याला शेतीसाठी द्यायचा निर्णय झाला, परंतु बेबी कालवा अस्तित्वात नसल्याने ते सांडपाणी नदीत सोडले जात होते. बेबी कालवा लाभक्षेत्राला त्याचा काहीही फायदा होत नव्हता. बेबी कालवा सुरू करावा किंवा तो चालू होऊ शकतो, अशी सुतराम शक्यता कोणाच्या डोक्यात नव्हती.
दरम्यानच्या काळात सन २०१४ मध्ये राहुल कुल आमदार झाले. पाणी टंचाई भीषण असली, तरी बेबी कालवा चालू करावा, अशी कोणाची मागणी नव्हती. मात्र, राहुल कुल यांची चाणाक्ष नजर बेबी कालव्यावर पडली अन् त्यांनी हा कालवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाला निधी उपलब्ध करून दिला. काम सुरू झाले. कालव्यात उगवलेली झाडी काढणे, नव्याने भराव टाकून कालवा करणे, त्याचे अस्तरीकरण ही सर्व कामे पूर्ण झाली. कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. याचा फायदा दौंड व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे. या बेबी कालव्यामुळे दौंडच्या पश्चिम पट्यातील शेती उन्हाळ्यातही हिरवीगार असते.
सांडपाणी शुद्ध न होता ते बेबी कालव्याला येत आहे. ही तक्रार असली असली, तरी तांत्रिक अडचणी दूर झाल्या की आज ना उद्या पाणी शुद्ध येऊ शकते. आज अशी परिस्थिती आहे की, तीव्र टंचाईच्या काळात हे सांडपाणीसुद्धा शेतकऱ्यांना वरदान वाटू लागले आहे. लोकांनी मागणी न करता सुविधा मिळणे म्हणजे शासन आणि प्रशासन हे आपले कर्तव्य ओळखून जबाबदारीने काम करीत आहे, असा अर्थ होतो. हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. कारण, लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका नव्हेत, तर जनतेच्या गरजांची जाणीव ठेवणारे शासन होय.

खडकवासला ते फुरसुंगी बोगदा
पाणी बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. हे सूत्र आमदार राहुलदादा यांनी पक्के ओळखले आहे. नवीन मुठा कालवा बंद नळीतून करावा, अशी मागणी होती. मात्र, असा प्रकल्प अस्तित्वात येणे सध्या तरी शक्य वाटत नाही. पुणे शहरातील टँकर माफिया, पाणी गळती, पाणी चोरी त्यातून पाण्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आमदार कुल यांनी खडकवासला धरण ते फुरसुंगी भूमीगत कालवा करण्याचा निर्णय घेतला. हा कालवा करावा, अशी कोणाची मागणी नव्हती. या प्रकल्पाला २१०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पामुळे तीन टीएमसी पाणी वाचणार आहे. तीन टीएमसी म्हणजे एका धरणाची निर्मिती होय. या कालव्यावरची कोट्यवधी रुपयांची जमीन पुणे शहराला वापरता येणार आहे. नवीन मुठा कालव्याच्या एका आवर्तनाला तीन टीएमसी पाणी लागते. प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर योग्य नियोजन केले तर शेतीचे एक आवर्तन वाढेल.

हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपूल
अनेकदा आपण पाहतो की, लोकांनी आंदोलन केल्याशिवाय रस्ता बनत नाही, पाणीपुरवठा सुरू होत नाही, किंवा शाळेला शिक्षक मिळत नाहीत. पण, जर प्रशासन आणि समाज दोघेही जागरूक असतील, तर ही मागणी करण्याची वेळच येणार नाही. यासाठी संवेदनशीलता आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असते. हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपूल या सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची कोणी मागणी केली नव्हती. तरीही याची गरज ओळखून कुल यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत या कामाचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केलेला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम संथ गतीने चालू आहे. परंतु या प्रकल्पाला आगामी काळात मंजुरी मिळेल. हा उड्डाणपूल व रिंगरोड झाल्यानंतर पुणे शहर व मुंबईला पोचण्याचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दळणवळण सुलभ असेल तर विकासाला चालना मिळते. उद्योगधंदे या भागात येतील. आणि हे सर्व पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळास पूरक आहे. पुरंदर विमानतळ होण्याच्या अगोदर रिंगरोड व उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. जेव्हा शासन, स्वयंसेवी संस्था, आणि सामान्य नागरिक सगळे मिळून लोकहितार्थ कार्य करतात तेव्हा मागणीनुसार नव्हे तर मागणीपूर्वीच सुविधा मिळतात. हाच खरा विकासाचा मार्ग आहे.

दौंड तालुक्यात होणार उपक्रीडा संकुल
दौंड शहरात क्रीडा संकुलाला जागा मिळाली आहे. ते आज ना उद्या पूर्णत्वास जाईलच. परंतु ग्रामीण भागातील सर्व मुले तेथे जाईन त्या क्रीडा संकुलाचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यात सहा ठिकाणी सरकारी जागेत मीनी उपक्रीडा संकुल होत आहेत. न्हावरे- चौफुला या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्याची अनेक वर्षापासून मागणी होती. मात्र, या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करा, अशी मागणी नव्हती. मात्र, राहुल कुल यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित केला.

मुळशी धरणाचे पाणी
मुळशी धरणाचे पाणी खडकवासला धरण प्रकल्पात आणणे, हा कुल यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प करत असताना अनेक धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. हा प्रकल्प गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे त्यास वेळ लागणार, हे निश्चित आहे. हे पाणी आले तर पुढील अनेक पिढ्यांच्या पाण्याची सोय होणार आहे, असा कुल यांचा दावा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात प्रकल्पात लक्ष घालून आहेत. या प्रकल्पासाठी सरकारने एक समिती नेमली आहे. त्या समितीत राहुल कुल यांचा समावेश आहे.

(शब्दांकन- रमेश वत्रे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com