दौंड तालुक्यात पीक बदलाचा सकारात्मक कल

दौंड तालुक्यात पीक बदलाचा सकारात्मक कल

Published on

दौंड तालुक्यात पीक बदलाचा सकारात्मक कल

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका हा राज्यातील महत्त्वाचा कृषी पट्टा म्हणून ओळखला जातो. पारंपरिकरीत्या ऊस हे प्रमुख पीक असलेल्या या तालुक्यात अलीकडच्या काही वर्षांत लक्षणीय पिक बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ऊस पिकाऐवजी कापूस, केळी, मका या पिकांचे क्षेत्र वाढत असून हा बदल शेतीच्या दृष्टीने सकारात्मक आणि आशादायी मानला जात आहे.

- महेश रूपनवर, समन्वयक, ‘आत्मा’

हवामानातील अनिश्चितता, पाण्याची टंचाई, भूजल पातळीत घट, जमीन नदीकाठच्या गावात चोपण जमिनी, तसेच उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे ऊस लागवड अनेक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत होती. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी कमी कालावधीची, तुलनेने कमी पाण्यावर येणारी व बाजारपेठेत मागणी असलेली पिके स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ही बदलती मानसिकता शेतीतील दूरदृष्टीचे दर्शन घडवणारी आहे.
कापूस हे नगदी पीक असून, कोरडवाहू व मध्यम प्रतीच्या जमिनीतही समाधानकारक उत्पादन देण्याची क्षमता त्यात आहे. तसेच, नदीकाठच्या गावातील जमीन काळी व भारी असल्याने अशा जमिनीत कापूस पीक चांगल्या पद्धतीने व ५- ६ महिन्यात उत्पादन देत आहे. ऊस पिकामध्ये १४- १८ महिने पीक असल्याने कालावधी खूप मोठा आहे.
कापूस पीक निघून गेल्यानंतर त्या शेतात शेतकरी कांदा पीक उत्पादन घेत आहेत. दौंड तालुक्यात कांदा चाळीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे बाजारभाव कमी असल्यास शेतकरी वखारीत कांदा ठेऊन टप्पा टप्प्याने तो विक्रीसाठी काढत असतात. दौंड तालुक्यात केडगाव येथील स्थानिक बाजारपेठ, बंगलोर, हैदराबाद अशा ठिकाणी कांदा विक्रीसाठी जात असतो.
कापूस व कांदा ही पिके चांगली उत्पादन देणारी आहेतच, सोबत पीक बदल व जमिनीचा पोत सुधारण्यास ऊस पिकाच्या तुलनेत खूप मोठी मदत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल कापूस पिकाकडे वाढला आहे.
आधुनिक बियाणे, शास्त्रीय पद्धतीने लागवड व एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे कापूस शेती अधिक फायदेशीर होत आहे. शासनाच्या आधारभूत किंमत धोरणामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची खात्री मिळत असून आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे.
मका पिकालाही दौंड तालुक्यात वाढती पसंती मिळत आहे. अल्प कालावधीत येणारे हे पीक पशुखाद्य, कुक्कुटपालन व अन्नप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त ठरत आहे. दौंड तालुक्यातील मळद, खडकी रावणगाव या ठिकाणी मका पिकाचे क्षेत्र वाढत आहे. दौंड तालुक्यात दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व जोडधंदा असल्याने शेतकरी अलीकडील काळात कृषी विभाग व आत्मा यांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुरघास निर्मितीकडे वळले आहेत. बाजारपेठेत सातत्याने मागणी असल्याने मक्याला हमखास दर मिळत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागत आहे.

केळी पिकाला महत्त्व
बागायती पिकांमध्ये केळीने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. ठिबक सिंचन, सुधारित वाणांच्या वापरामुळे कमी पाण्यातही अधिक उत्पादन घेणे शक्य झाले आहे. तसेच, ११ ते १२ महिन्यात केळी पीक ऊस पिकाच्या तुलनेत चांगले उत्पन्न देत आहेत. दौंड बारामती, इंदापूर, सोलापूर या ठिकाणी केळी पिकाचे क्षेत्र वाढत आहे. शीतगृहाची उपलब्धतेमुळे व्यापारी वर्गाला एकाच ठिकाणाहून खरेदी व वाहतूक करणे सोपे आहे. याचा फायदा पर्यायाने शेतकरी वर्गाला होत आहे.
केळीला देशांतर्गत बाजारपेठेत सतत मागणी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळत आहे. अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी केळी लागवडीद्वारे यशस्वी शेतीचे उदाहरण घालून दिले आहे. या पीक बदलामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक विविधीकरण आणि आर्थिक जोखीम कमी करणे शक्य झाले आहे. कृषी विभाग, आत्मा योजना, विविध शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनामुळे हा बदल अधिक व्यापक स्वरूप घेत आहे.
दौंड तालुक्यातील पीक बदल हा केवळ शेतीतील बदल नसून तो शाश्वत विकास, पर्यावरण संतुलन आणि शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल आहे. ही चळवळ इतर
तालुक्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.

(शब्दांकन- रमेश वत्रे, केडगाव)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com