फसवणूकप्रकरणी शेतकऱ्याला १७ महिन्यांनी मिळाला न्याय
केडगाव, ता. ४ : ‘यवत पोलिसांकडून उच्च न्यायालयाचा अवमान’ या मथळ्याखाली दैनिक ‘सकाळ’ने २५ डिसेंबर २०२५ला सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. ट्रॅक्टर खरेदीत फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला या वृत्तामुळे अखेर १७ महिन्यांनंतर सव्वातीन लाख रुपये मिळाल्याने शेतकऱ्याने ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
चौफुला (ता.दौंड) येथील शेतकरी राहुल सरगर व दीपक शेंडगे यांनी पांढरेवाडी येथील आकाश मानसिंग चव्हाण यांच्याकडून पाच लाख ७५ हजार रुपयांस ट्रॅक्टर विकत घेतला होता. ट्रॅक्टर हस्तांतरित करताना तीन लाख २५ हजार रुपये दिले होते. चव्हाण याने कागदपत्रांची पूर्तता तीन महिन्यांत केल्यानंतर उर्वरित पैसे द्यावयाचे असे २३. ऑक्टोबर २०२३ च्या विक्री व्यवहार करारात ठरले होते. त्यानंतर तीन महिन्यांनी सरगर यांनी चव्हाण याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चव्हाण याने कागदपत्रांची पूर्तता न करता ४ ऑगस्ट २०२४ला मध्यरात्री गुपचूप ट्रॅक्टर घेऊन जात असल्याचे सरगर यांना कळले. त्यांनी पाठलाग करून चव्हाण यास अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो थांबला नाही. त्यानंतर सरगर व शेंडगे यांनी यवत पोलिसात तक्रार दिली होती. त्या नंतर अनेक पाठपुराव्यानंतर १० महिन्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आकाश चव्हाण याचा बारामती सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. उच्च न्यायालयाने सुद्धा चव्हाण याचा जामीन फेटाळला. चव्हाणने केलेला गुन्हा गंभीर असल्याने त्याला पोलिस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करा असा आदेश २० नोव्हेंबर २५ ला उच्च न्यायालयाने दिला. अनेकदा पाठपुरावा करूनही पोलिस चव्हाण याला अटक करत नव्हते. त्यामुळे याबाबत ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आरोपी चव्हाण सव्वातीन लाख रुपये घेऊन यवत पोलिसात हजर झाला. पोलिसांनी चव्हाण यास अटक न करता त्याच्याकडून मुद्देमाल ( सव्वा तीन लाख रुपये) ‘हस्तगत’ केला. मुद्देमाल हस्तगत (रिकव्हरी) झाल्याने आता आरोपीला अटक करता येत नाही अशी ‘बाजू’ आता पोलिस मांडत आहेत. हा सर्व घटनाक्रम विनासायास घडत गेला. पोलिसांनी शुक्रवारी (ता. २) शेतकरी राहुल सरगर यांना यवत पोलिस ठाण्यात बोलावून कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्याकडे सव्वातीन लाख रुपये सुपुर्त केले.
दैनिक ‘सकाळ’ची साथ मिळाल्याने आम्हाला आमचे पैसे मिळाले. अन्यथा या प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला नसता. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही कारवाई होत नसेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.
- राहुल सरगर, शेतकरी
या प्रकरणात आमची दिरंगाई झाली हे मी मान्य करतो. रिकव्हरी झाल्याने आरोपीला अटक करता येत नाही. आरोप पत्र दौंड न्यायालयात दाखल केले जाईल.
- नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक यवत.
4139
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

