चौफुल्यात तरुणांकडून प्रथमच ‘बलिदान मास’
केडगाव, ता. ८ ः चौफुला- नवीनगाव (ता. दौंड) येथे प्रथमच ‘बलिदान मास’ अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावाने पाळला जात असून, परिसरात या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या आयोजनामागे कोणतीही मोठी संस्था, मोठा पदाधिकारी नसून, येथील कामगार व मजुरी करणाऱ्या कष्टकरी हातांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम सुरू केला आहे. श्रीराम प्रतिष्ठाणच्यावतीने या मासाचे आयोजन होत आहे.
दौंड तालुक्यात मोजक्याच गावात असे उपक्रम चालू आहेत. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ पाळल्या जाणाऱ्या या मासात या शिवभक्तांकडून सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. दररोज सायंकाळी संभाजी महाराजांशी संबंधित श्लोक, स्तोत्रे व ऐतिहासिक प्रसंग सांगितले जातात. यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमान व इतिहासातील बलिदानाबद्दल आदराची भावना निर्माण होत आहे.
या काळात सहभागी व्यक्ती आपल्या घरातील व्यक्तीच्या निधनानंतर जसा शोक पाळला जातो, तसा दुखवटा पाळत आहेत. एक वेळच भोजन करणे, आवडता पदार्थ वर्ज करणे, पायात चप्पल न घालणे, मुंडन करणे, गोडधोड पदार्थ न खाणे, पलंगावर न झोपणे अशा विविध बाबी बलिदानाचे स्मरण म्हणून पाळल्या जात आहेत.
चौफुल्यातील नवीनगाव ही वस्ती प्रामुख्याने कष्टकरी समाजाची म्हणून ओळखली जात असली तरी या ठिकाणी इतक्या समर्पणाने आणि शिस्तीत ‘बलिदान मास’ साजरा होत असल्याने समाजात शक्ती व भक्तीचा संदेश जात आहे. या उपक्रमातून सामाजिक एकात्मतेचेही दर्शन घडत असल्याचे प्रतिष्ठाणचे सदस्य नितीन गावडे यांनी सांगितले.
श्रीराम राऊत, मल्हारी थोरात, सौरभ खरात, विजय जाधव, सौरभ थोरात, ओंकार कोळेकर, तुषार खंडाळे, रामा थोरात, धनंजय चव्हाण, सौरभ खरे, अमोल रूपनवर, किरण पावडे, नंदू बोऱ्हाडे, गोविंद राठोड, विशाल कसबे, मंगेश खंडाळे आदी मुले श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून बलिदान मास पाळत आहेत.
मूक शोकयात्रेचे आयोजन
छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंयात्रा निघाली नव्हती. अंत्ययात्रेचे प्रतिरूप म्हणून येत्या फाल्गुन वद्य अमावस्येला (ता. १८) मशाल मूक शोक यात्रा चौफुल्यात काढली जाणार आहे. वढू येथून आणलेली ज्योत शोक यात्रेत असेल. राम मंदिरावरील यज्ञात या मशालीचे विसर्जन केले जाईल.
04253
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

