

निमगाव केतकी, ता.२२: पेरू या फळपिकामधून एकरी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याने अलीकडे पेरूची प्रचंड लागवड झाली. सध्या पेरूचे प्रचंड उत्पादन सुरू आहे.किलोला सरासरी ५० ते ६० रुपये मिळणाऱ्या दरात मोठी घसरण झाली असून सध्या किलोला अवघा पंधरा ते वीस रुपये एवढा कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. पेरू उत्पादकांचा खर्चही निघत नाही. तसेच व्यापारी खरेदी करण्यास टाळाटाळ करू लागल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
जिल्ह्यात तेल्या रोगामुळे डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्यानंतर शेतकऱ्यांनी याला पर्याय पेरूचा शोधला. मागील पाच-सहा वर्षांपासून पेरूला एकरी पाच ते सहा लाख मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळवला. सध्या जिल्ह्यामध्ये पेरूचे सुमारे १६ हजार एकर क्षेत्र असून सर्वाधिक इंदापूर तालुक्यात पाच हजार एकर एवढे मोठे क्षेत्र आहे.
मागील दोन महिन्यापूर्वी सर्वात जास्त लागवड असलेल्या पेरूच्या पिंक तैवान वाणाला प्रति किलो ४० ते ५० रुपये असलेला दर सध्या पंधरा रुपयावर आला आहे तर व्हीएनआर ला ८० ते ९० रुपये मिळणारा बाजारभाव २० ते २५ व गुजरात रेडला मिळणारा दीडशे रुपयांपर्यंत बाजारभाव ४० रुपयांवर आला आहे.
शेळगाव येथील पेरू उत्पादक अतुल शिंगाडे म्हणाले, माझा २० एकर पेरू सुरू आहे. एक किलो पेरूला फोम लावणे व मजुरी नऊ रुपये व खते औषधे व्यवस्थापन सहा रुपये असा एका किलोला पंधरा रुपये उत्पादन खर्च होत आहे व सध्या पेरू पंधरा रुपये किलो विकला जात आहे त्यामुळे हातात एकही रुपया राहत नाही.
मोठा खर्च करून व कष्टाने पेरू पिकवला आहे. मात्र सध्या व्यापारी माल घेत नसल्याने आम्ही घरच्या घरीच पेरू तोडत असून, तो मुंबईला पाठवत आहोत.
- रोहित शेंडे, युवा शेतकरी, निमगाव केतकी
मागील महिन्यात बाजारभाव थोडे कमी आहेत. मात्र मागणीपेक्षा यंदा उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे बाजारभावात सध्या जास्त घसरण झालेली आहे.
- बुवा हेगडे, स्थानिक व्यापारी, निमगाव केतकी
पेरूच्या लागवडी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे व नवीन जातींना उत्पादनही जास्त प्रमाणात झाले. यामुळे उत्पादनात वाढ झाली. प्रक्रिया उद्योग पेरूच्या देशी वाणांना अधिक पसंती देतात, त्यामुळे तैवान पिंक, व्ही एन आर व डायमंड रेड या अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांच्या निर्यातीसाठी द्राक्षे व डाळिंब निर्यातीसाठी शासनाने ज्या पद्धतीने विशेष प्रयत्न केले, त्या पद्धतीने पेरू निर्यात वाढीसाठी देखील करणे आवश्यक आहे. प्रभावी उपाययोजना केल्या तरच शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सरासरी दर मिळतील.
- तुषार शेंडे, संचालक, महाऑरगॅनिक ॲन्ड रेसिड्यू फ्री फार्मस असोसिएशन(मोर्फा), पुणे
02490
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.